बुलढाणा : अनैसर्गिक असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत युती केली. मात्र, भाजपने गरज म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. पण शिवसेनेचा त्याच्याशी संबंध नाही, असे विधान माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे. हे वक्तव्य करून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
हेही वाचा >>> अकोला जिल्हा परिषदेच्या २८४ पदांसाठी तब्बल १.४६ कोटी रुपये परीक्षा शुल्क जमा; १६ हजार उमेदवार स्पर्धेत
शिवसेना( शिंदे गट)चे बुलढाणा जिल्हा पक्ष निरीक्षक खोतकर यांनी लोणार बाजार समितीमध्ये आयोजित कार्यकर्ता बैठकीत हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी अनेक राजकीय भाकिते व्यक्त केली. अध्यक्षस्थानी आमदार संजय रायमुलकर हे होते. खोतकर पुढे म्हणाले की, आगामी निवडणुका लक्षात घेता कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गाव तेथे शाखा, शाखा तेथे फलक अभियान राबविण्याचे आवाहन खोतकर यांनी केले. यावेळी जालना संपर्कप्रमुख पंडित भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, भगवान सुलताने, संतोष मापारी, अंजली गवळी, शिवकुमार तेजनकर, भगवान कोकाटे, जगाराव आडे, प्रकाश पोफळे, विजय सानप, कारभारी सानप, इम्रान खान पठाण, डॉ. हेमराज लाहोटी, शालिक डव्हळे, संतोष आघाव, विश्वंभर दराडे उपस्थित होते.
हेही वाचा >>> कौतुकास्पद! जिल्हा परिषद शाळेची श्वेता उमरे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण
राजकीय भाकिते यावेळी बोलताना निरीक्षक खोतकर यांनी राजकीय भाकितेही केली. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. तसेच दीर्घकाळ रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे ते म्हणाले.