अकोला : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (शिंदे गट) विठ्ठल सरप यांच्या निवासस्थानावर बुधवारी रात्री हल्ला करून तोडफोड करण्यात आली. पक्षाचे उपनेते व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या इशाऱ्यावरून हल्ला झाल्याचा गंभीर आरोप सरप यांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

हेही वाचा – चंद्रपूरमधील राजकीय समीकरणे कायम

हेही वाचा – “फडणवीसांची नागपुरातील जागा धोक्यात”, चंद्रकांत खैरेंचा दावा; म्हणाले, “भाजपाची लबाडी..”

अकोला जिल्हा शिवसेनेत निधीवरून बाजोरिया विरूद्ध पदाधिकारी, असा वाद गेल्या महिनाभरापासून रंगला आहे. आता तो तोडफोड आणि मारहाणीपर्यंत पोहोचला. जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांना हटविल्यानंतर बाजोरिया समर्थकांनी जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांच्या घरी गोंधळ घातला. विठ्ठल सरप यांचे गोरक्षण मार्गावरील सहकारनगर भागात घर आहे. सरप यांच्या निवासस्थानी पाच जणांकडून तोडफोड करण्यात आली. यावेळी धक्काबुक्की झाल्याचा आरोपही सरप यांनी केला. या संदर्भात खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सरप कुटुंबीयांचा जबाब नोंदविला असून, अद्याप गुन्हे दाखल झालेले नाही.