अकोला: शिवसेनेत अभूतपूर्व उभी फूट पडल्यानंतर एकमेकांच्या विरोधात असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गट व भाजप अकोट पंचायत समितीच्या सत्तेत एकत्र आले आहेत. अकोट पंचायत समितीमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा सभापती झाला, तर भाजपला उपसभापतीपद मिळाले. बार्शिटाकळीमध्ये भाजपला महाविकास आघाडीने साथ दिली. चार ठिकाणी वंचितने आपले वर्चस्व कायम राखत झेंडा फडकवला. जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सत्तासमीकरणासाठी सोईचे राजकारण करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वाशीम: सरकारकडून शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही; रविकांत तुपकरांचा ‘या’ दिवशी राज्यव्यापी आंदोलनाचा ईशारा

हेही वाचा >>> वर्गमित्राने अश्लील चित्रफीत काढून मागितली खंडणी; तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल

अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती पदाची निवडणूक रविवारी पार पडली. वंचित बहुजन आघाडीचं संपूर्ण बहुमत असलेल्या अकोला पंचायत समितीवर भाजपला सभापतीपद मिळाले. अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या सभापतीपदाचा उमेदवार भाजपकडेच होता. त्यामुळे भाजपच्या सुलभा सोळंके यांची बिनविरोध सभापतीपदी निवड झाली, तर उपसभापतीपदावर वंचितचे अजय शेगोकार बिनविरोध निवडून आले. मागच्या वेळी शिवसेनेकडे असलेली पातूर पंचायत समितीही वंचित बहुजन आघाडीने ईश्वरचिठ्ठीत आपल्याकडे खेचून घेतली. सभापतीपदी सविता टप्पे, तर उपसभापतीपदी इमरान खान यांची निवड झाली. अकोटमध्ये भाजपच्या मदतीमुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या हरदिनी वाघोडे सभापती झाल्या आहेत, तर उपसभापतीपदी भाजपचे संतोष शिवरकर निवडून आले. बार्शिटाकळीत शिवसेनेच्या बंडखोर सुनंदा मानतकार यांनी भाजपात प्रवेश करीत सभापतीपद मिळवले. याठिकाणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपला मदत केली, उपसभापतीपदावर भाजपचे संजय चौधरी यांची निवड झाली. मूर्तिजापूरात महाविकास आघाडीत बिघाडी झाली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने साथ दिल्यामुळे वंचितच्या आम्रपाली तायडे सभापती, तर शिवसेनेचे देवाशीष भटकर उपसभापती झाले. तेल्हारा आणि बाळापूर पंचायत समितीवर वंचित आघाडीने वर्चस्व राखले. तेल्हारा पं.स.च्या सभापतीपदी आम्रपाली गवारगुरू, तर उपसभापतीपदी किशोर मुंदडा हे निवडून आले. बाळापूर पं.स.च्या सभापतीपदी वंचित आघाडीच्या शारदा सोनटक्के, तर उपसभापतीपदी राजकन्या कवळकार यांची निवड झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena supports uddhav thackeray group in akot akola politics convenience power equation ysh