यवतमाळ : जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचा महाविजय झाला, त्या निमित्त मतदारांचे आभार मानण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुरुवारी यवतमाळात येत आहे. शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्या आभार यात्रेवर टीका करत, निषेध आंदोलन केले. स्थानिक संविधान चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्यासह पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
महायुतीने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र आता उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे सांगून, शेतकऱ्यांना थकीत कर्ज भरण्याचा सल्ला दिला. लाडक्या बहिणींनाही दोन हजार १०० रुपये देण्याचे जाहीर करून, तेही दिले नाही.
वचनपूर्तीतील अनेक आश्वासने पूर्ण करण्याचे महायुती सरकार टाळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर शिवसेना उबाठा पक्षाने आक्रमक पवित्रा घेत ही आंदोलन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळात पोहोचण्यापूर्वीच हे आंदोलन झाले. आंदोलकांनी महायुती सरकारचा निषेध करणारे आंदोलन केले.त्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी करा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला.
आंदोलनात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, किशोर इंगळे, नितीन माकोडे आदींसह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.
एकीकडे पक्षाचे आंदोलन दुसरीकडे पक्षात फूट !
संविधान चौकात शिवसेना उबाठाचे आंदोलन सुरू असताना याच पक्षातील काही पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारी करत होते. शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, तालुका प्रमुख संजय रंगे, उपतालुका प्रमुख संदीप सरोदे, माजी सभापती एकनाथ तुमकर, विभागप्रमुख विष्णु राठोड, गजानन राऊत यांच्यासह पुसद, वणी, दिग्रस तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी या आभार यात्रेच्या निमित्ताने प्रतिस्पर्धी शिवसेनेला धक्का देत ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम यशस्वी केली, अशी चर्चा जिल्ह्यात आहे.
सभास्थळी काळा रंग निषिद्ध
येथील पोस्टल मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सायंकाळी सभा होत आहे. या सभेसाठी जिल्हाभरातून हजारो नागरिक आले आहेत. मात्र सभास्थळी काळे कपडे, दुपट्टा, शर्ट घालून आलेल्या नागरिकांना प्रवेशद्वारावरच त्यांना अडवत होते. काळा शर्ट, दुपट्टा बाहेर काढून जाण्याच्या सूचना पोलीस देत होते. काळया रंगाच्या आड कोणी निषेधाचे साहित्य घेऊन येण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेतली जात असल्याचे, अवधुतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षण नरेश रणधीर यांनी सांगितले.