नागपूर : नागपूरपासून मुंबईपर्यत महापालिकेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. राऊतांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत फूट अटळ असल्याचे स्पष्ट होत आहे.

राऊत म्हणाले, मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवायला हव्या. राजकारणात आम्ही नेहमी संस्कार आणि संस्कृती पाळली. सरकार जे चांगले काम करते, विरोधी पक्षाने त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र ती परंपरा दुर्दैवाने भाजपने मोडली. राजकीय विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले. ईडी सीबीआयचा गैरवापर केला, अशी टीकाही राऊत यांनी केली.

हेही वाचा >>> भय तिथले संपत नाही… केसगळती, टक्कल साथीचा शेजारी तालुक्यातही शिरकाव; रुग्णसंख्या दीडशेच्या घरात

 ‘कोण कुठे जाणार, हे फडणवीस ठरवणार नाहीत’

शुक्रवारी एका कार्यक्रमात फडणवीस यांनी राजकारणात काहीही घडू शकते, असे वक्तव्य केले होते. त्याला उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपबरोबर वाढत असलेल्या जवळीकीचा संदर्भ होता. त्या अनुषंगाने पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कोण कुठे जाणार, कुठे येणार हे फडणवीस ठरवणार नाहीत. प्रत्येक पक्षाची एक भूमिका, विचारसरणी असते. राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकण्याची परंपरा भाजप सोडणार असेल तर आम्हीस्वागत करू. पण तानाशाहीविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील.

Story img Loader