बाळासाहेब ठाकरेंनी रूजवलेली, वाढवलेली शिवसेना निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अखेर एकनाथ शिंदे यांची शिवसेना झाली. मात्र सामान्य शिवसैनिकाला हा निर्णय अजिबात आवडलेला नाही. या निर्णयाबद्दल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल समाज माध्यमांवर प्रचंड टीका होत आहे. एका सामान्य शिवसैनिकाने लिहिलेले असेच एक पत्र समाज माध्यमावर व्हायरल झाले आहे.बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेबद्दल नितांत निष्ठा असलेला व पत्र लिहिणारा हा शिवसैनिक कोण हे कळू शकले नाही, मात्र सामान्य शिवसैनिकही हे पत्र स्वत:च्या नावाने फिरवत आहेत. या पत्राचा मायना आणि मजकूर असा,
हेही वाचा >>>ठाणे: साहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरण; अटकेतील चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी
‘थँक्यू मिस्टर शिंदे…’
“इतर अनेकांप्रमाणेच मीही गावावरून नोकरीसाठी मुंबईला आलेलो. तेव्हा गावात शिवसेनेचं जवळपास कुणीच नव्हतं. मुंबईत आल्यावर शिवसेना कळायला लागली. नोकरीला लागल्यावर लोकाधिकार समितीचं काम करताना शिवसेना अंगात भिनायला लागली. बाळासाहेबांच्या जिथून जमेल तिथून ऐकलेल्या भाषणांनी अंगात संचारणं म्हणजे काय असतं, ते जाणवायला लागलं.
अनेक तालुक्यात लोकाधिकार समितीतर्फे निरीक्षक म्हणून काम करताना गावा खेड्यातल्या शिवसैनिकांची ओळख व्हायला लागली. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले साधेभोळे, निष्ठावान शिवसैनिक. कुणालाही हेवा वाटेल असा हा ठेवा आहे.”
हेही वाचा >>>डोंबिवलीत सेल्फी काढल्याच्या रागातून आई, मुलीला मारहाण
“पण काय आहे मिस्टर शिंदे,
तुमच्यासारखे लोक जेव्हा शिवसैनिकांच्या मेहनतीवर व बाळासाहेबांच्या आशीर्वादाने निवडून आले ना अगदी आपल्या पोराटोरांसह, त्यांना सगळ्या बाजूंनी सगळं मिळाल्यानंतर चटकच लागली. मग कसंही, कुठूनही निवडून येणं. हेच महत्वाचं वाटायला लागलं तुमच्या सारख्यांना. पण शिवसैनिक तसाच आहे. फाटकाच. आता तुम्ही जे काही केलंय ती गद्दारीच. तुम्ही पहिले नाही आणि शेवटचेही नसणार. पण तुम्ही जे केलंय ते आजपर्यंत कुणी नाही केलं. तुम्ही आमच्या स्वाभिमानाला धक्का पोचवलाय. आमची शिवसेना दिल्लीच्या ठगांच्या मदतीने चक्क चोरलीत.”
“एक लक्षात ठेवा मिस्टर शिंदे; ज्यांना शिवसेना, ठाकरे, मातोश्रीचा अडथळा वाटतो. १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन होताना मुंबई हातची गेली असा ज्यांचा समज आहे, त्यांची सोबत घेऊन शिवसेनेवर ताबा मिळवताय. नांव मिळालंय, चिन्हही मिळालंय. मिळाली नाही आणि मिळणार ही नाही, ती आमची निष्ठा आणि मातोश्रीवर असलेली श्रध्दा. कारण प्रत्येक सच्चा शिवसैनिक मानतो की, आजही आमचं दैवत त्या वास्तूत वावरतंय.”
हेही वाचा >>>मेट्रो येऊ द्याच, पण पहिले जमिनीवरुन चालण्याजोगे वातावरण निर्माण करा, २७ गावातील रहिवाशांची राजकीय मंडळींवर टीका
“थॅंक्यू यासाठी म्हटलं मिस्टर शिंदे, की स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर प्रश्न पडला होता काय करायचं? तो प्रश्न सोडवलात तुम्ही. चक्क आयुष्य वाढवलंत माझं. किमान पंधरा वर्षांनी. आता लवकर मरायचं नाहीय आणि मरणारही नाही. गद्दारांना गाडल्याशिवाय वर गेलो तर बाळासाहेब लाथ मारून खाली हाकलतील. उध्दवला, आदित्यला सांभाळा सांगितलं होतं. तू असाच वर आलास. माफ नाही करणार ना बाळासाहेब. सगळं परवडेल, पण मोठ्या साहेबांची नाराजी कशी परवडेल?”
तेव्हा…“आता फीट रहायचं आणि तुमच्यासह साऱ्या गद्दारांना राजकीय पटलावरून दूर करीपर्यंत उसंत नाही घ्यायची. थॅंक्यू वन्स अगेन मिस्टर शिंदे. भेटूच निवडणूकीच्या आखाड्यात. आमच्याशी एकट्याने लढायची हिंमत नाहीय तुमची. दिल्ली वरून फौजा बोलवा. तीच तुमची खरी ताकद.”
थॅंक्यू…तुम्हाला जय महाराष्ट्र नाही म्हणणार. तो मान गमावलाय तुम्ही.
एक कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक.
असे हे पत्र सध्या निष्ठावंत शिवसैनिक सर्वत्र फिरवत आहेत. त्यावर उत्तर देताना नेटकरीही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.