अमरावती: शहरात जागोजागी कचरा साचला आहे, स्वच्छता नाही, ठिकठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. या अडचणीच्या वेळोवेळी तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्‍या वतीने ‘कचरा फेको’ आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेवर राजापेठ चौक येथून मोर्चा काढण्यात आला. महापालिकेवर धडकलेल्या शिवसैनिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला. पोलिसांनी महापालिकेच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह इतर दोन दारे पोलिसांनी बंद केली होती. दरम्यान महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसैनिक कचरा घेऊन धडकले आणि त्यांनी थेट महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कचरा फेकला. यावेळी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. शिवसैनिकांनी यावेळी महापालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यानंतर काही वेळाने पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेसाठी आत प्रवेश दिला.

हेही वाचा… अकोल्याच्या नशिबी ध्वजारोहणालाही मंत्री नाहीच; उपमुख्यमंत्री फडणवीस जिल्ह्याला वेळ देतील का?

आयुक्त देविदास पवार आणि आरोग्य अधिकारी सीमा नेताम यांनी आंदोलनकर्त्‍यांना सामोरे न जाता महापालिकेतून पळ काढण्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. शिवसैनिकांच्या प्रतिनिधी मंडळा सोबत उपायुक्त मेघना वासनकर यांनी चर्चा केली. शहरातील प्रश्नांसंदर्भात आम्हाला आयुक्तांसोबतच चर्चा करायची असून सोमवारी अकरा वाजता कुठल्‍याही स्थितीत आयुक्त आणि आरोग्य अधिकारी या बैठकीला उपस्थित असायलाच हव्यात, असा इशारा देत शिवसैनिकांनी सोमवारी पुन्हा महापालिकेवर धडकण्याचा इशारा दिला. या आंदोलनात शिवसेनेच्या नेत्या प्रीती बंड, महानगरप्रमुख पराग गुडधे, राहुल माटोडे, प्रवीण हरमकर, प्रदीप बाजड, स्वाती निस्ताने यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv senas thackeray group kachra feko protest was held in front of municipality entrance mma 73 dvr
Show comments