अकोला : कावडधारी शिवभक्तांवर काळ बनून ट्रक आला आणि भरधाव वाहनाने अनेकांना उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेमुळे अकोट तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले आहे. अकोटवरुन अनेक कावड आणि पालखी शहरातून मिरवणूक काढतात, अन् गांधीग्रामवरून आणलेलं पवित्र जल तपेश्वर मंदिरात अभिषेक करण्यासाठी जातात.
हेही वाचा >>> नागपुरातील एसटी कार्यालयासमोर महिलेचे उपोषण.. विभाग नियंत्रकांच्या विरोधात…
अकोट शहरातील सिंधी कॉलनीचे सिंध नवयुवक मंडळ हे काल दुपारी गांधीग्रामला पूर्णा नदी पात्रात पवित्र जल आणण्यासाठी निघाले होते. मध्यरात्री जल घेऊन परतीच्या मार्गावर असताना अकोट गांधीग्राम मार्गावरील पळसोद फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या ४०७ ट्रकने या मंडळातील शिवभक्तांना धडक दिली. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले. यापैकी एकाच्या डोक्यावर गंभीर मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आकाश मनोहरलाल मोटवानी असे मृत्यू पावलेल्या तरुण शिवभक्ताचे नाव आहे. तर सुरज बंगेशवर विरवानी हा जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला होता, मात्र काही दूर अंतरावर पोलिसांनी वाहनाला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करीत आहे.