आमदार अमोल मिटकरी व युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद थांबवण्याचे नाव घेत नाही. आ. मिटकरींनी शिवा मोहोड यांना पाच कोटी रुपयांची मानहानीची नोटीस वकिलामार्फत पाठवल्यानंतर आता मोहोड यांनी पलटवार केला आहे. मोहोड यांनी आ.मिटकरींना एक रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. आमच्या मानहानीची किंमत आ.मिटकरींना झेपणार नाही. त्यासाठी ते आणखी काही गैरप्रकार करतील. त्यामुळे अल्पकिमतीची नोटीस त्यांना पाठविली आहे, असा टोला मोहोड यांनी लगावला.
हेही वाचा >>> बुलढाणा : वाचाळवीरांना आता घेरून मारणार; शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा इशारा
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यामध्ये अकोला राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आले. शिवा मोहोड यांनी जयंत पाटील यांच्यापुढे तक्रारीचा पाढा वाचताना आ. मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देताना आ. मिटकरी यांनी आरोप करणाऱ्यांचे चारित्र तपासावे, असे म्हटले होते. त्यामुळे संतापलेल्या मोहोड यांनी आ. मिटकरींचा खरपूस शब्दात समाचार घेत आरोपांच्या फैरी झाडल्या. १० दिवसांत पुराव्यांसह आरोप सिद्ध करेल, असा इशारादेखील त्यांनी दिला. यासर्व पार्श्वभूमीवर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे महेबूब शेख यांनी अकोल्याचा दौरा करून दोघांचीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रदेश नेत्याचे हे प्रयत्न निष्फळ ठरले. याप्रकरणी आ. मिटकरी यांनी पाच कोटी रुपयांची मानहानीची नोटीस वकिलामार्फत मोहोड यांना पाठवली. आता मोहोड यांनीदेखील त्याला प्रत्युत्तर दिले आहे. चारित्र्यावर वक्तव्य केल्याप्रकरणी आ.मिटकरींना नोटीसद्वारे सात दिवसांत लेखी माफी मागण्याचे सांगण्यात आले आहे. एक रुपयाची नुकसान भरपाई मागितली आहे. कायदेशीर कारवाईचा इशाराही नोटीसमधून देण्यात आला आहे.