१६० सदस्य, ५० ढोल अन् १५ ताशांचा लवाजमा
शहरातील ‘शिवसंस्कृती’ ढोल-ताशा पथकाचा नाद आता इतर राज्यातही पोहोचला आहे. १९७०-१९८० च्या दशकात ढोल-ताशातील सात पारंपरिक वाद्यांची परंपरा ‘शिवसंस्कृती’ने जपली आहे.
तरुणाईला करायचे बरेच असते, पण कित्येकदा त्यांना तो ‘प्लॅटफार्म’ मिळत नाही. गणेशोत्सव हे असे माध्यम आहे, ज्यातून संस्कृती-परंपरा जपली जाते आणि सामाजिक कार्य देखील त्यातून घडते. शहरातील ‘शिवसंस्कृती’च्या प्रवासाची कथाही अशीच आहे.
एक, दोन, पाच असे करता करता गेल्या सात-आठ वर्षांत १६० सदस्यांची चमू तयार झाली आहे. ५० ढोल, १५ ताशे आणि पारंपरिक वेशातील चमूचा हात जेव्हा त्यावर फिरतो, तेव्हा अवघा आसमंत निनादतो. देशावर प्रेम सारेच करतात, पण अनेकदा हे प्रेम समाजमाध्यमांपुरते मर्यादित राहते. संस्कृती-परंपरेच्या बाता सारेच मारतात, पण तेही समाजमाध्यमांवरच. प्रत्यक्षात काय? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच येते.
‘शिवसंस्कृती’ ढोल-ताशा पथकातून समाजमाध्यमांवरील भावना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात बरेच यश आले आहे. रक्तदान किंवा इतर अनेक शिबिरांच्या माध्यमातून समाजकार्य सुरू आहे. विशेष म्हणजे, या कार्याचा कुठेही गवगवा नाही. दोन वर्षांच्या चिमुकल्यापासून तर ज्येष्ठ नागरिक असा सर्वाचा सहभाग या पथकात आहे. गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीपासून त्यांचा सराव सुरू होतो. मंदिरात वादन करून शुभारंभ केला जातो.
सांस्कृतिक उपक्रमात वैदर्भीयही अग्रेसर
सांस्कृतिक उपक्रमात पुण्या-मुंबईतील तरुणाई कशी अग्रेसर असते, मग वैदर्भीय तरुणाईत ते गुण असताना ते मागे का पडतात, अशी खंत होती. गणेशोत्सवात तिकडे ढोल-ताशे वाजतात आणि आपल्याकडे मात्र डीजेच्या तालात मद्य रिचवून धिंगाणा घातला जातो. हे कुठेतरी बदलायचे होते. त्यासाठी संस्कृती-परंपरा पुढे नेणारा ढोलताशाचा निनाद हे माध्यम योग्य वाटले. पाहता पाहता सात-आठ वर्षांत महाराष्ट्राची संस्कृती-परंपरा सहकाऱ्यांच्या मदतीने इतर राज्यात पोहचवता आली, याचा अभिमान आहे.
– प्रसाद मांजरखेडे, ‘शिवसंस्कृती’ ढोल ताशा पथक