नागपूर : समाजातील सर्वसामान्यांप्रमाणेच आम्हीही कष्ट करून उदरनिर्वाह करायला तयार आहोत. मात्र, आम्हाला सर्वसामान्यांसारखीच वागणूक द्यायला, नोकरी द्यायला, त्यांच्यात सामावून घ्यायला, लोक तयार आहेत का, असा प्रश्न शिवन्या व मोहिनी या तृतीयपंथीयांनी उपस्थित केला. ‘मोहिनी’च्या सहकार्याने ‘शिवन्या’ने अलीकडेच ‘अर्धनारी फूड ट्रक’ सुरू केला. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सध्या महाराजबाग ते सीताबर्डी या मार्गावर ‘अर्धनारी फूड ट्रक’ दिसून येतो.
सेवा इंटरनॅशनलच्या सहकार्याने आणि मिशन विश्व ममत्त्व फाऊंडेशनअंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. केवळ तृतीयपंथी असल्यामुळे अभियांत्रिकीची पदवी घेऊनही ‘शिवन्या’ला नोकरी मिळाली नाही. सुरुवातीला हिंगणा एमआयडीसी परिसरात अनेक कंपन्या पालथ्या घातल्या आणि मग हे खूळच डोक्यातून काढून टाकले. मात्र, हाताला असलेल्या चवीने बरेच काही मिळवून दिले. आधी चहाचा छोटा व्यवसाय आणि त्यानंतर घरी बसून पदार्थांचे ‘ऑर्डर’ घेतले. दरम्यान, विश्व ममत्व फाऊंडेशनच्या श्रद्धा जोशी यांनी पुढाकार घेतला. सेवा इंटरनॅशनलने मदतीचा हात पुढे केला. त्यातून ‘सेकंडहँड’ वाहन खरेदी करून त्याचे ‘फूड ट्रक’ मध्ये रूपांतर केल्याचे ‘शिवन्या’ने सांगितले. सुरुवातीला आम्हाला अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यावर आम्ही मात केली, असे मोहिनीने सांगितले. तृतीयपंथीयांचा जो चेहरा समाजासमोर आहे तो आम्हाला बदलायचा होता.
हे ही वाचा…नवनीत राणांना धमक्या कोण देतंय? त्याचा राजकीय संबंध आहे का?
आमच्यातही बदल घडवून आणावे लागतील
तृतीयपंथीयांसाठी सरकारकडे अनेक प्रकल्प आहेत, पण ते केवळ नावासाठीच. मुंबई, दिल्लीसारख्या शहरात थोडाफार तरी लाभ मिळतो, पण नागपूर शहरात अजूनही आम्हाला स्वीकारार्हता लाभलेली नाही. आम्हालाही नाव कमवायचे आहे. त्यामुळे समाजाने देखील आम्हाला एक सामान्य माणूस म्हणूनच स्वीकारायला हवे. आमच्यात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी सहकार्याची गरज आहे. काही बाबतीत आम्हालाही आमच्यात बदल घडवून आणावे लागतील. कुणासमोर हात न पसरता शिक्षण घेऊन, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे लागेल, असे शिवन्या व मोहिनी यांनी सांगितले.
हे ही वाचा…बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात आढळला युवतीचा निर्वस्त्र मृतदेह ; हत्येचा संशय
प्रशासकीय सेवेचे स्वप्न
मूळची नांदेड जिल्ह्यातील ‘शिवन्या’ने नागपूर शहरातील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. परिस्थिती बेताची असताना स्वप्न मात्र मोठी होती. वाचनाची प्रचंड आवड असलेल्या ‘शिवन्या’ला भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे आणि त्यासाठी तिची तयारी देखील सुरू आहे.
हे ही वाचा…नागपूर: उड्डाण पुलांचा घोळात घोळ, सोयींऐवजी वाहतूक कोंडीची भर
सर्वांत सुंदर तृतीयपंथीयाचा पुरस्कार
मूळची नागपूरचीच असलेल्या ‘मोहिनी’ने समाजकार्य विषयात पदवी घेतली आहे. समाजकार्याची तिला प्रचंड आवड आहे, पण त्याचबरोबर ती एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. भारतभरात ती इतर तृतीयपंथी सहकाऱ्यांसह नृत्याचे सादरीकरण करते. दिसायला मोहक असलेल्या ‘मोहिनी’ने २०२१ चा सर्वात सुंदर तृतीयपंथीयाचा पुरस्कार पटकावला आहे.