देशात आणि राज्यात सध्या महागाईने उच्चांक गाठला असून याचा फटका राज्यातील शिवभोजन केंद्रांनाही बसत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या या केंद्रांना आज महागाईमुळे दहा रुपयात दोन चपात्या, भात, भाजी, वरण इतके जेवण देणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासकीय स्वस्त धान्य दुकानातून दारिद्र्यरेषेखालील दरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी शिवभोजन केंद्र संचालक समितीने मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसेच केंद्रांची वेळही सकाळी ९.३० ते रात्री ९ पर्यंत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा- नागपूर विद्यापीठ परिसराला विज्ञानाच्या पंढरीचे रूप; नवनवीन संशोधनांचे आजपासून महाप्रदर्शन
राज्य सरकारने राज्यात अनेक ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्रे सुरू केली. त्यास गरीब जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसाद पाहून राज्य सरकार टप्प्याटप्प्याने शिवभोजन थाळी केंद्रांच्या संख्येत वाढ करत आहे. शिवभोजन थाळी केंद्र चालवण्यास देताना महिला बचत गटांचा प्राधान्याने विचार करण्यात आला. अनेक महिला बतच गटही केंद्रे उत्तम चालवत आहेत. त्याद्वारे या महिला बचत गटांतील सदस्यांना रोजगार व आर्थिक स्थैर्यही मिळत आहे. मात्र, हल्ली वाढत असलेल्या महागाईचा मोठा फटका या केंद्रांना बसत आहे. राज्यातील जवळपास ९५ टक्के शिवभोजन केंद्र भाड्याच्या जागेत आहेत. किमान दहा हजारांपासून २० हजारांपर्यंत हे भाडे आहे. त्यात वीज आणि पाण्याचे शुल्क वेगळे द्यावे लागते. केंद्र शासनाने गहू, गोडे तेलावर वस्तू व सेवाकर लावला. तांदळाचे दरही ४० रुपये किलाेंच्या कमी नाही. त्यामुळे दहा रुपयांमध्ये शिवभोजन थाळी देणे कठीण होत असल्याचे शिवभोजन केंद्र संचालक समितीने म्हटले आहे.