नागपूर : देशात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान मिळवणारे आणि एनडीए सरकारमध्ये कृषी खाते सांभाळणारे शिवराजसिंग चौहान यांना राजकीय क्षेत्रात मामा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून ते तब्बल आठ लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याशी त्यांचे कौटुंबिक संबध आहेत. गोंदिया येथे त्यांची सासूरवाडी आहे. त्यामुळे चौहान यांची केंद्रात मंत्रीपदी नियुक्ती होताच गोंदियातही फटाके फुटले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. शिवराजसिंग तेथे मुख्यमंत्री होते. भाजपने या राज्यात दणदणीत विजय मिळवला होता. मात्र भाजपने त्यांना मुख्यमंत्री केले नव्हते. पक्षाने त्यांच्यावर केलेला हा एकप्रकारचा अन्याय होता. पण त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. पक्षाने त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदिशा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितले होते. तेथे ते ८ लाखांहून अधिक मते घेऊन विजयी झाले. त्यांच्या या विक्रमी विजयाची दखल घेऊन भाजपने त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला व त्यांच्याकडे कृषीखाते देण्यात आले.
हेही वाचा…प्रफुल्ल पटेलांना पटोलेंचा पुन्हा ‘दे धक्का’!
सर्वसामान्यातील एक अशी प्रतिमा असलेल्या शिवराजसिंग चौहान यांना कृषी खाते मिळाल्याने मध्यप्रदेशमध्ये शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला तसाच तो मध्यप्रदेश सीमेवरील महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातही साजरा करण्यात आला. या आनंदाला एक कौटुंबिक किनारही आहे. त्यांच्या पत्नी साधना सिंह या गोंदियाच्या आहे. गोंदियाचे ते जावई आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील त्यांच्या परिचितांनी चौहान मंत्री झाल्यानंतर अभिनंदन केले. केंद्रात एनडीए सरकार येणार हे स्पष्ट झाल्यावर विदर्भातून कोण मंत्री होणार याबाबत चर्चा सुरू होती. या चर्चेत गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचेही नाव होते. पण पटेल मंत्री होऊ शकले नाही. पण गोंदियाचा जावई मात्र देशाचा कृषीमंत्री झाला.
हेही वाचा…प्रेयसीला मित्राने केला प्रपोज, युवक संतापला अन् नंतर जे घडलं ते…
शिवराजसिंह यांना दिल्लीत संसदेत काम करण्याचा अनुभव आहे. यापूर्वी १९९६ मध्ये चौहान विदिशा मदारसंघातून विजयी झाले होते.त्यानंतर १९९८, १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. ते मध्यप्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी मध्यप्रदेशात राबवलेल्या लेकलाडकी योजनेमुळे भाजपला या राज्यात पुन्हा सत्ता प्राप्त करता आली होती. देशात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. हमीभावानुसार शेतमालाला भाव मिळावे यासाठी यापूर्वी देशात अनेक आंदोलने झाली होती. कृषीमंत्री म्हणून चौहान अशा प्रकारच्या आंदोलनाला कसे तोंड देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.