महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी आणि शिवप्रेमातून शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती झाल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. याचवेळी दसरा मेळाव्यासंदर्भात भाष्य केल्याने शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाचा दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट घेणार की उद्धव ठाकरे यावरुन दोन्ही गटांमध्ये नवी ठिणगी पडण्याची शक्यता आहे. असं असतानाच आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी याचसंदर्भातून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सूचक विधान केलं आहे.

नक्की वाचा >> गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडला, पृथ्वीराज चव्हाणांच्या नाराजीची सुद्धा चर्चा; फडणवीस म्हणाले, “काँग्रेसची परिस्थिती…”

उद्धव ठाकरे काल नेमका काय म्हणाले?
मराठी माणसाला जो दुहीचा शाप आहे तो गाडण्याची सुरुवात केली आहे. आता सणांचे दिवस आहेत. ते संपले की दसऱ्याआधी आठवडाभर गटनेत्यांचा मेळावा आणि त्यानंतर दसरा मेळावा घेणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रभर फिरून लोकांशी संवाद साधणार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

फडणवीस काय म्हणाले?
आज मारबतनिमित्त नागपूरमध्ये दाखल झालेल्या फडणवीस यांनी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला जाणार आहे. कोणाला परवानगी मिळेल? एकनाथ शिंदेंना की उद्धव ठाकरेंना? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “जे नियमात आहे ते होईल. नियमाच्याबाहेर जाऊन या सरकारमध्ये काहीच होणार नाही,” असं सांगितलं.

गृहमंत्री म्हणून एवढचं सांगू शकतो…
“दसरा मेळावासुद्धा एकनाथ शिंदे हायजॅक करणार अशापद्धतीचं मत उद्धव ठाकरे गटाकडून व्यक्त केल जात आहे,” असं म्हणत अन्य एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस यांनी, “हे बघा असं आहे की, एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचा काय निर्णय आहे याची मला कल्पना नाही. ते मेळावा घेणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही. उद्धव ठाकरे मेळावा घेणार आहे का याचीही मला कल्पना नाही. गृहमंत्री म्हणून एवढचं सांगू शकतो की, जे नियमात असेल ते आम्ही करु,” असं उत्तर दिलं.

Story img Loader