नागपूर : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मंगळवारी सादर केला. त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या संपत्तीच्या विवरणानुसार त्यांच्याकडे चल व अचल संपत्ती मिळून कोट्यवधीची मालमत्ता आहे. तुमाने यांच्याकडे ९० लाख ३५ हजाराची चलसंपत्ती तर ११ कोटी २५ लाख रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्यापत्नीकडे चल संपत्ती २७ लाख २७ हजाराची तर अचल संपत्ती ५४ लाख ६७ हजार रुपयांची आहे. तुमाने यांच्यावर ५० लाख १३ हजार रुपयांचे कर्ज आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर ५८ लाखांचे कर्ज आहे.

रामटेकमधून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या कृपाल तुमाने यांनी शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत राहणे पसंत केले. त्यामुळे त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल याची खात्री होती. पण भारतीय जनता पक्षाने त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याने एकनाथ शिंदे यांनी त्यांना उमेदवारी नाकारली व त्यांच्याऐवजी काँग्रेसमधून आलेले राजू पारवे यांना उमेदवारी दिली. मात्र पारवे यांचा पराभव झाला. तुमाने यांना उमेदवारी नाकारताना विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार शिंदे यांनी त्यांना उमेदवारी दिली. मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. विधान परिषदेसाठी निवडणूक झाली तर शिंदे सेनेकडे असलेल्या आमदारांच्या संख्याबळाचा विचार केला असता तुमाने यांचा विजय निश्चित मानला जातो.

हेही वाचा : सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत झिकाचे रुग्ण…आरोग्य विभाग म्हणते…

लोकसभेची उमेदवारी नाकारल्यावर निवडणूक प्रचारा दरम्यान तुमाने शांत होते. मात्र रामटेकमध्ये पक्षाचा उमेदवार पराभूत झाल्यावर त्यांनी जाहीरपणे आपल्यावर अन्याय झाल्याची खंत व्यक्त केली होती. भाजप नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळेच आपल्याला उमेदवारी मिळाली नाही,असा जाहीर आरोप त्यांनी वृत्त वाहिन्यांशी बोलताना केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार असेही त्यांनी सांगितले होते. भाजपने तुमाने यांच्या आरोप फेटाळले होते. रामटेकमधून कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी शिवसेनेचा प्रश्न होता. तुमाने दोन वेळा खासदार भाजपच्या मदतीमुळेच झाले होते याची आठवणही भाजपने करून दिली होती. तुमाने यांनी जाहीर खदखद व्यक्त केल्यावर त्यांना शांत करण्यासाठी त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाील होती. त्यांना विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी दिली जाईल, असा कयास लावला जात होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. विधान परिषदेच्या दोन्ही जागा विदर्भात देण्यात आल्याने शिवसेनेत विशेषत: मुंबईतील इच्छुकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.