अकोला : महाराष्ट्रासह संपूर्ण देश नासवण्याचे कार्य भाजपकडून सुरू आहे. महाराष्ट्राचे अहित करणे हेच भाजपचे कर्तृत्व आहे, अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली. रविवारी अकोल्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देशात बेरोजगारी, महागाई, महिलांचे अत्याचार, शेतकऱ्यांच्या समस्या, आता आलेला ओला दुष्काळ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून देशाच्या संविधानाला धक्का लावण्याचे काम भाजपकडून होत आहे, असा आरोप खा. सावंत यांनी केला. शिवसेनेचा दसरा मेळावा हा देशाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. शिवतीर्थासाठी शिवसेनेचा पहिला अर्ज आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेलाच परवानगी मिळेल.
हेही वाचा : वर्धा : पंतप्रधान मोदींबाबतच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद; नाना पटोलेंचा पुतळा जाळला
दसरा मेळाव्यावरून गलिच्छ राजकारण थांबवले पाहिजे. शिवसेनेच्या निर्मितीपासून एक अपवाद वगळाता शिवसेनेचा प्रत्येक मेळावा शिवतीर्थावर झाला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या मेळाव्यातून गरजले, बरसले. देशाला, राज्याला नवी दिशा दिली. मराठी माणसाच्या उत्कर्षासह देशात हिंदुत्वाचा पुकार केला. त्यांनी हिंदुत्व अंगीकारले, त्याचे त्यांना शासन देखील भोगावे लागले. शिवसेना आणि शिवतीर्थाचे अतुट नाते आहे, ते कुणालाही तोडता येणार नाही. ही परंपरा असून त्यात आडवे येण्याची गरज काय? असा सवालही खा. सावंत यांनी केला.