नागपूर : विधान भवन परिसरातील जुने शिवसेना कार्यालय सोमवारी एकनाथ शिंदे गटाला तर दुसरे कार्यालय उद्धव ठाकरे गटाला मिळाले. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यालयातून शिवसेना पक्ष कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांना बाहेर काढले गेले. हे कर्मचारी अश्रू गाळत नवीन कार्यालयात आले. हे कळल्यावर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी नवीन शिवसेवा कार्यालय गाठले व घाबरू नका, मी कायम तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात त्यांना धीर दिला.
शिंदे गटाला जुने कार्यालय तर ठाकरे गटाला दुसरे कार्यालय दिले गेले. शिंदे गटातील कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र काढून येथील शिवसेना कार्यालयातील दोन महिला व चार पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढले गेले. हे कर्मचारी रडतच नवीन कार्यालयात आले. दरम्यान, रवींद्र वायकर यांनी या कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय केली.
आता सेनेबाहेर पडलेल्या नेत्यांसाठी सलग ३० वर्षे या कर्मचाऱ्यांनी सेवा दिली, त्यांचा अवामन केल्याबद्दल वायकर यांनी रोषही व्यक्त केला. ही बाब उद्धव ठाकरे यांना कळल्यावर ते स्वत: प्रथमच नवीन कार्यालयात पोहचले. येथे त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. स्वत: ठाकरे यांनी सांत्वन केल्याने कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. उद्धव ठाकरे साहेब सदैव काळजी घेत असल्याची भावना एक कर्मचारी अर्चना खंडिजोडे यांनी व्यक्त केली. कसलीच काळजी करू नका. मी सदैव सोबत आहे, असे ठाकरे यांनी सांगितल्याचे गिता सावंत म्हणाल्या.