नागपूर : नागपूर हा केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा राजकीय गड मानला जातो. नागपूरचे खासदार नितीन गडकरी केंद्रात मंत्री आहेत. नागपूरचे देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री आहेत. नागपूर जिल्ह्यातील चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. याच नागपुरात भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बुधवारी आंदोलन केले. त्याला कारण ठरले ते अमित शहा यांनी पुण्यात उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य. यापूर्वी विरोधी पक्षांकडून अनेकदा सत्ताधारी नेत्यांविरोधात आंदोलने झाली. मात्र प्रथमच शिवसैनिक अमित शहा विरुद्ध रस्त्यावर उतरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनापक्ष प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी नागपुरात निदर्शने केली. मागील दहा वर्षांत केंद्रातील भाजपच्या सत्ताकाळानंतर प्रथमच नागपुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन झाले.

हेही वाचा – गोंदिया : वैनगंगा, बाघ नदी उफाळली, सहा गरोदर महिलांना अखेर…

माजी उपमहापौर व शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात रेशीमबाग चौकातील शिवसेना भवन कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचा दारुण पराभव झाला असून तो या पक्षाच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच पुणे येथे अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांचे हे आंदोलन असल्याचे कुमेरिया यांनी सांगितले. अमित शाह यांची दादागिरी महाराष्ट्राची जनता व शिवसैनिक खपवून घेणार नाही. येत्या विधानसभेत अमित शाह व भाजपाला याचा परिणाम भोगावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलनात शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने अंजुषा बोधनकर, सुशिला नायक, सुरेखा खोब्रागडे, मीना अडकणे, शारदा मेश्राम, अंकुश कडू हरी बानाईत, अजय दलाल, संदिप रियाल, महेंद्र कठाणे, उमेश निकम, राजू दळवी, रामचंद्र दुबे गजानन चकोले, आदी व्यक्तींचा समावेश होता.

हेही वाचा – पोलिसांना ‘हा’ अधिकारच नाही, माहिती अधिकारातून सत्य उघड

भाजपच्या गडात झालेल्या या आंदोलनाला भाजपकडून कसे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विशेष म्हणजे मंगळवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत आरोप केले होते. दुसऱ्या दिवशी अमित शहा यांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली हे येथे उल्लेखनीय.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena protest against amit shah in nagpur cwb 76 ssb