अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघात १९९९ पासून शिवसेनेच्या खासदाराने प्रतिनिधित्व केले आहे. आनंदराव अडसूळ हे दोन वेळा खासदार होते. गेल्या वेळी थोड्या मतांच्या फरकाने ते पराभूत झाले. त्यामुळे यावेळी अमरावती लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क असून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना सर्वांचा विरोध आहे, असा दावा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
महायुतीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अभिजीत अडसूळ म्हणाले, अमरावती लोकसभा मतदारसंघात पाच वेळा शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेने उमेदवारी मागणे वावगे नाही. आनंदराव अडसूळ हे दहा वर्षे खासदार होते. गेल्या निवडणुकीत केवळ ३० हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता. परंतु यावेळचे वातावरण पाहिले, सर्वेक्षण पाहिले, तर आजच्या ज्या खासदार आहेत, त्यांच्या विरोधातील वातावरण आहे. महायुतीच्या आजच्या मेळाव्यातूनही दुसरा कुणीतरी उमेदवार असावा, अशी सर्वपक्षीय मागणी समोर आली आहे. यावेळी शिवसेनेचा सक्षम उमेदवार आमच्याकडे आहे. आनंदराव अडसूळ असतील, किंवा मी स्वत: असेन, अमरावतीतून शिवसेनेचा उमेदवार राहील, असा दावा अभिजीत अडसूळ यांनी केला.
अभिजीत अडसूळ हे दर्यापूरचे माजी आमदार असून माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र आहेत. महायुतीच्या मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदारद्वय बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी अनुपस्थित राहून नाराजी दर्शवलेली असताना अडसूळ यांच्या दाव्याने महायुतीत उमेदवारीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आनंदराव अडसूळ आणि राणा दाम्पत्यामधील वाद सर्वश्रुत आहे. २०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. राज्यात सत्तांतरानंतर अडसूळ यांनी शिवसेनेच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. ठाकरे गटातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. आता अडसूळ यांच्या भूमिकेमुळे महायुतीत संघर्षाची ठिणगी पडली आहे.