विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या एका विधानावरून महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसचा मोठा भाऊ झाला आहे, असं विधान अजित पवारांनी केलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा अधिक असायच्या. तेव्हा जागावाटपात आम्हाला लहान भाऊ म्हणून कमी जागा मिळायच्या. आता आम्ही काँग्रेसचे मोठे भाऊ झालो आहोत. काँग्रेसचे ४४, तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत,” असं अजित पवार यांनी म्हटलं. यावर नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला होता. त्यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
“महाराष्ट्रातील एका घटनाबाह्य सरकारविरुद्ध आम्ही लढतोय”
“मला यात जायचं नाही. अजित पवार वरिष्ठ नेते आहेत. पण, महाराष्ट्रातील एका घटनाबाह्य सरकार आणि हुकूमशाहीविरोधात आम्ही लढत आहोत,” अशी मोजक्या शब्दांत आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं आहे.
“केंद्रीय तपास यंत्रणांकडून दबाब आणण्याचा प्रयत्न”
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. याबद्दल विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “या देशात जो कोणी सत्याबरोबर उभा राहतो. अथवा खरे बोलत सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहे, त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांकडून दबाब आणण्याचा प्रयत्न केला जातोय. हा पॅटर्न देशभरात सगळीकडे दिसत आहे. आपल्या देशात हुकूमशाही सुरू झाली असून, कुठेही लोकशाही दिसत नाही,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
हेही वाचा : जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले…
“काही विधान करणं चुकीचं नाही”
अजित पवारांच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. “आजच्या स्थितीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबर, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तीन नंबरला आहे. त्यामुळे विधान करणं चुकीचं नाही. पण, अशा वक्तव्यांना फारसं महत्वं नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह वाढवण्यासाठी अशी वक्तव्य करण्यात येतात,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.