उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमधून बाहेर काढण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) प्रयत्न सुरु आहे, असा मोठा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आता ठाकरे गटानेचे अरविंद सावंत यांनीही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
अरविंद सावंत हे बुलढाणा दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं, यासंदर्भात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर बोलण्या ऐवजी, स्वत:च्या मुलावर बोलावं, असं प्रत्युत्तर अरविंद सावंत यांनी दिलं.
नेमकं काय म्हणाले अरविंद सावंत?
“चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी स्वतःच्या मुलाकडे बघावं, त्याची काय लपवा-छपवी चालली आहे, त्याकडे लक्ष द्यावं, अपघात झाल्यानंतर सीसीटीव्ही अचानक कसे गायब होतात. याचं उत्तर द्यावं, त्यानंतर मग उद्धव ठाकरेंवर बोलावं”, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली.
तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना बच्चू कडूंना केलं लक्ष्य
पुढे बोलताना त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनीही लक्ष्य केलं. “राज्यात तिसरी आघाडी सत्तेत येणार असून आमचाच मुख्यमंत्री होईल, असं बच्चू कडू म्हणाले होते. यासंदर्भात बोलताना, बच्चू कडू यांनी आतापर्यंत कितीतरी वेळा राजीनामा देण्याच्या गोष्टी केल्या आहेत. त्यांच्या गोष्टींना शेंडा बुडूक काही नसतं. त्यामुळे यासंदर्भात न बोललेलं बरं”, असे ते म्हणाले.
“राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल”
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विचारलं असता, “यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. आमच्या पक्षाला ज्या जागा मिळतील, त्या आम्ही एकत्र मिळून लढवू आणि जिंकू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढण्यात येणार असल्याच्या चर्चांवर विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, “उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे पे वर्कर यासाठी खोटा नरेटिव्ह तयार करत आहेत त्यामधून अशा प्रकारच्या बातम्या येतात. मात्र, मी तर असं म्हणतो की, उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमधून बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट करत आहेत. उद्धव ठाकरेंना कबूल केलं की मुख्यमंत्री करू. पण ते उद्धव ठाकरे यांना साथ देत नाहीत. त्यांना दिल्लीत दोन दिवस बसून ठेवलं होतं. उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री पद द्या, म्हणून दिल्लीत कटोरा घेऊन फिरत होते. मात्र, दोन दिवस राहून देखील ते तेथून मोकळा कटोरा घेऊन आले”, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.