चंद्रपूर: गणतंत्र दिवसाच्या पूर्व संध्येला उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर (३०) याची गुरुवार २५ जानेवारीच्या रात्री ९.३० वाजताच्या सुमारास धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणात पोलिसांनी राजकीय पक्षातील माजी पदाधिकारी व सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाला अटक केली आहे. वाळू तस्करीतील वर्चस्वातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शिवा वझरकर सरकार नगर येथे अग्रवाल कोचिंग क्लासेसजवळ एकाला भेटायला गेले होते. तिथे दोघांमध्ये चर्चा सुरू असताना आरोपी घटनास्थळी आला व शिवा वझरकर यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यात वझरकर गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत सरकार नगर येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरने मृत घोषित केले. या घटनेनंतर सरकार नगर तुकुम येथे तणावाची स्थिती निर्माण झाली.
हेही वाचा – प्रजासत्ताक दिनी एक महिला करणार पुरुष तुकडीचे नेतृत्व; वर्धेच्या सुनेने रचला इतिहास
हत्याकांडाचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले व रुग्णालय परीसरात गर्दी झाली. गर्दीने आरोपीच्या वाहनाची तोडफोड केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हत्याकांडात सहभागी दोन्ही आरोपी काही दिवसांपूर्वी हाफ मर्डरच्या केसमधून कारागृहातून जामिनावर बाहेर आले होते. मृतक व आरोपी यामध्ये काही वाद झाला होता. त्याबाबत बोलण्याकरिता मृतक आरोपीला भेटायला गेला होता, असे सांगण्यात येत आहे. मात्र त्याठिकाणी बाचाबाची झाली आणि वाद वाढला, या वादात युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर यांच्या पोटात धारदार चाकू या शस्त्राने हल्ला केला, त्या हल्ल्यात शिवा वझरकर जागीच ठार झाला.
हेही वाचा – लग्न जुळवताना हुंडा मागता का? मराठा सर्वेक्षणासंबंधी प्रश्नावलीत वादग्रस्त प्रश्न
शिवा हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. या प्रकरणी इतर फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. घटनेनंतर पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, बल्लारपूर, घुग्घुस, भद्रावती व चंद्रपूर पोलीस दाखल झाले होते. वाळू तस्करी ही या हत्याकांडामागील मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.