राज्यात एकीकडे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले असताना दुसरीकडे सभागृहाबाहेरही दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर परखड शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदेंनी आज देवेंद्र फडणवीसांसमवेत नागपुरातील आरएसएसच्या कार्यालयाला भेट दिली. यावरून टोला लगावताना उद्धव ठाकरेंनी थेट सरसंघचालक मोहन भागवत यांनाच सल्ला दिला आहे.
“सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला”
अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “दोन आठवड्यांपासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडलाय हे दिसतंय. अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी जनतेला काय दिलं, हा प्रश्न राहणार आहे. त्याचं उत्तर या सगळ्यांनी दिलं पाहिजे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिवेशन काळामध्ये रोज एकेक मंत्र्याच्या घोटाळ्यांविषयी आरोप झालेत, चर्चा झाली आहे. इतिहास पाहिला तर आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन त्या त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. यावेळी तसं होईल असं वाटत नाही. पण गेल्या सहा महिन्यांत हे सरकार नेमकं करतंय काय, हे लोकांच्या समोर आलंय. एनआयटीपासून घोटाळ्यांची सुरुवात झाली. मग सत्तार, उदय सामंत या सगळ्यांच्या घोटाळ्यांबाबत सरकार काय करणार? की आरोप झाले त्यांना क्लीनचिट आणि आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणं हेच या सरकारचं धोरण आहे का? हे सरकारने स्पष्ट करायला हवं”, असं ते म्हणाले.
BMC मध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे : “सत्तेशिवाय समोरासमोर या मग…”; संजय राऊतांचं शिंदे गटाला थेट आव्हान!
“हा मानसोपचार तज्ज्ञांना विचारण्याचा विषय”
दरम्यान, शिंदे गटाकडून मुंबई महानगर पालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयांवर दावा सांगण्याच्या प्रकारावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. “काल मुंबई महापालिकेत मिंधे गट गेला होता, आज तर आरएसएस कार्यालयात गेला होता. ज्यांच्यात कर्तृत्व नसतं, स्वत: काही निर्माण करण्याची ताकद नसते ते सरळ सरळ चोऱ्या करतात किंवा दुसऱ्यांच्या गोष्टींचा ताबा घेतात. शेवटी हा मानसोपचार तज्ज्ञांना विचारण्याचा विषय आहे. काहींच्या मनात न्यूनगंड असतो की आपण काही करू शकत नाहीये. काहीतरी केलं तर पाहिजे. त्या न्यूनगंडाची जाणीव असते. मग ते न्यूनगंडाचं रुपांतर अहंगंडात करतात. दुसऱ्यांचे नेते, पक्ष, ऑफिस बळकवायचं”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केलं.
मोहन भागवतांना सल्ला!
यावेळी बोलताना मोहन भागवतांनाही उद्धव ठाकरेंनी सल्ला दिला आहे. “आज ते (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आरएसएस कार्यालयातून बाहेर पडले असावेत. पण मोहन भागवतांना मी विचारतोय की कार्यालयाचा कोपरान् कोपरा तपासून बघा. कुठे लिंब टाकलेत का तेही बघून घ्या.कदाचित आज आरएसएसच्या कार्यालयातही ते ताबा घेण्यासाठीच गेले असतील”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिंदे गट शिवसेना भवनाचाही ताबा घेणार? प्रश्न ऐकताच संजय राऊत म्हणाले “त्यांचे बाप….”
“आरएसएसनं काळजी घ्यावी”
“यांची बुभुक्षित नजर आहे. ती फार वाईट आहे याचा आम्ही अनुभव घेतला आहे. जे काही चांगलं असेल, ते आपण नाही करू शकत तर त्याचा कब्जा कसा घ्यायचा ही त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे आरएसएसनंही यावर काळजी घेण्याची गरज आहे. कुठेही जायचं आणि ते बळकवायचा प्रयत्न करायचा. जणूकाही महाराष्ट्रात टोळ्यांचं राज्य आलंय की काय अशी भावना सामान्यांमध्ये यायला लागली आहे. काल त्यांनी आमच्या पालिकेतल्या कार्यालयाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला. आज ते आरएसएसच्या कार्यालयात गेले होते. आरएसएस मजबूत आहे म्हणून ते ताबा घेऊ शकले नसतील. पण आरएसएसनं काळजी घ्यायची गरज आहे”, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.