लोकसत्ता टीम
नागपूर: नागपूर- अमरावती मार्गावर ४ एप्रिलला एसटी महामंडळाच्या एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना ताजी असतांनाच गुरूवारी सकाळी नागपूर- भंडारा महामार्गावरही एका शिवशाही बसला आग लागली. वेळीच प्रवासी बसमधून उतरल्याने अनुचित प्रकार टळला.
नागपुरच्या घाट रोड आगारातील शिवशाही बस क्रमांक एमएच- ०९, ईएम- १२९३ ही नेहमीप्रमाने नागपूरहून भंडारासाठी गुरूवारी निघाली. मौदा रोडवर सकाळी ९ वाजताच्या दरम्यान अचानक बसच्या सायलेंसरच्या भागातून धूर निघू लागला. हा प्रकार बसच्या चालक- वाहकाच्या निदर्शनात आल्याने तातडीने बस थांबवून प्रवाश्यांना खाली उतरवण्यात आले. बसमध्ये सुमारे ३८ प्रवासी होते.
आणखी वाचा- रुग्णवाहिका नव्हे ‘फिरते प्रसुतीगृह’च; महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म, बाळ व माता सुखरूप…
दरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बसमधील अग्निशमन यंत्राच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर दुसऱ्या बसने प्रवाश्यांना पुढच्या प्रवासासाठी पाठवले गेले. यासंदर्भात एसटी महामंडळातील नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सायलंसरला रबरचा स्पर्ष झाला. त्यामुळे रबरने पेट घेतल्याने धूर निघाला. परंतु वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले असून काहीही अनुचित घडले नसून बसलाही नुकसान झाला नसल्याचा दावा केला.