अमरावती : अमरावती-नागपूर राष्‍ट्रीय महामार्गावर नांदगावपेठ नजीक भरधाव शिवशाही एसटी बस रस्‍त्‍याच्‍या कडेला उलटून झालेल्‍या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्‍यू झाला, तर २८ जण जखमी झाले. रविवारी सकाळी ९.३० वाजताच्‍या सुमारास हा अपघात घडला. रस्‍ता ओलांडणाऱ्या गायीला वाचविण्‍याच्‍या प्रयत्‍नात वाहनावरील नियत्रण सुटल्‍याने बस उलटल्‍याचे बसचालकाने सांगितले. जखमी प्रवाशांवर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमएच ०९ / ईएम १७७८ क्रमाकांची शिवशाही बस ही नागपूरहून अकोलाकडे जात होती. नांदगावपेठ नजीक अचानकपणे गाय रस्‍त्‍यावर आली. गायीला वाचविण्‍याच्‍या प्रयत्‍नात बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसची गायीला धडक बसली. त्‍यानंतर बस रस्‍त्‍याच्‍या कडेला उलटली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्‍यू झाला.

हेही वाचा…नागपूर : आई- मुलाची एकाचवेळी विक्रमी झेप

बसमधून एकूण ३५ जण प्रवास करीत होते. या अपघातात जखमी झालेल्‍या २८ जणांना येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. या अपघातात बसच्‍या काचा संपूर्णपणे फुटल्‍या. परिसरातील नागरिकांनी बचावकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच नांदगावपेठ पोलिसांचे पथक घटनास्‍थळी पोहचले. आपातकालीन दरवाजातून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्‍यात आले. या अपघातामुळे राष्‍ट्रीय महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही काळ ठप्‍प पडली होती.

महामार्गावरील मोकाट पाळीव जनावरांचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. महामार्गावर रस्‍त्‍याच्‍या मध्‍यभागी बसणाऱ्या, अचानकपणे रस्‍त्‍यावर येणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्‍याची शक्‍यता असते. त्‍यावर उपाययोजना करण्‍याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा…कारण राजकारण : नितीन राऊत यांच्या विरोधात भाजप उमेदवाराच्या शोधात

जिल्ह्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला असून अपघातात प्राण गमावणाऱ्यांची गेल्या सहा-सात महिन्यांतील संख्या भयावह आहे. गेल्या सहा महिन्यांत १४६ प्राणांतिक अपघात होऊन त्यांत १६६ जणांचा मृत्यू झाला.
जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ग्रामीण भागात एकूण २८५ अपघात झाले आहेत. त्यात १४६ प्राणांतिक, ७१ गंभीर तर ५६ किरकोळ अपघातांचा समावेश आहे. ७१ गंभीर अपघातांमध्ये १३४ जणांनी हात, पाय व अन्य अवयव कायमचे गमावले. किरकोळ अपघातांमध्ये ११४ जण जखमी झाले.

हेही वाचा…बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे….

या एकूण अपघातांपैकी ६६ अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर, १३१ अपघात हे राज्य महामार्गांवर तर ८८ अपघात अन्य मार्गांवर झाले आहेत. सर्वाधिक अपघात राज्य महामार्गांवर झाल्याने नव्याने अपघातप्रवण स्थळे निश्चित केली जात आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivshahi bus overturns on amravati nagpur highway near nandgaon peth one dead 28 injured mma 73 psg