नागपूर : भारतात ‘न्युमोनिया’ झालेल्या बालकांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. दर तासाला देशात १४ बालकांचा मृत्यू होतो. त्यामुळे, या आजाराचे निदान आणि उपचार याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे, असा इशारा लखनौ येथील संख्याशास्त्रज्ञ डॉ. शैली अवस्थी मिश्रा यांनी दिला. ‘न्युमोनिया’चा संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष त्यांनी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मांडले. बिहार आणि उत्तर प्रदेशातील १०० रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रातील २,०८७ पेक्षा अधिक रुग्णांचा अभ्यास करण्यात आला.
हेही वाचा >>> नीता अंबानी यांनीही महिला विज्ञान काँग्रेसला येण्याचे टाळले
‘पीसीव्ही १३’ या ‘न्युमोनिया’साठीच्या लशीचा डोस दिलेले आणि न दिलेले अशा विविध बालकांची निरीक्षणे नोंदवण्यात आली. ज्यांनी लशी घेतल्या आहेत, अशा बालकांना ‘न्युमोनिया’चा धोका कमी होता. त्याचप्रमाणे, मुली आणि कुपोषित बालकांमध्ये हा धोका जास्त असल्याचे संशोधनातून पुढे आले. पालकांमध्ये शिक्षणाची कमतरता आणि बालकांमधील इतर आजार हेही ‘न्युमोनिया’साठी साहाय्यभूत घटक असल्याचे अभ्यासात आढळले. भारताप्रमाणेच इतर देशांमध्येही ‘न्युमोनिया’वरील लशीचा वापर करण्यात आला. या लशीचा सर्वाधिक प्रभाव भारतात झाला आहे. एकूण रुग्णांपैकी ३१ टक्के रुग्णांवर लशीचा सकारात्मक प्रभाव झाल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे, देशभरातील ‘न्युमोनिया’चा सामना करण्यासाठी ही लस देणे आवश्यक असल्याचे डॉ. अवस्थी यांनी सांगितले.