अकोला : खोट्या व बनावट तक्रारी करून फिर्यादी पोलिसांचीच दिशाभूल करीत असल्याचे धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात घडत आहेत. या प्रकारची तीन प्रकरणे आतापर्यंत स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी उघडकीस आणली आहेत. अकोट फाइल पोलीस ठाण्याअंतर्गत जबरी चोरीचा बनाव रचल्याचे तपासात उघडकीस आले. या प्रकारामुळे पोलीसदेखील चक्रावले आहेत.
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून लुटमार, जबरी चोरीच्या बनावट व खोट्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे प्रमाण वाढले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्वक तपास करून अशा बनावट प्रकरणांचा पर्दाफाश केला. लुटमार, जबरी चोरीचे बोरगांव, पिंजर, अकोट फाइल पोलीस ठाण्यांत दाखल तीन गुन्ह्यांतील फिर्यादींनी बनावटी व खोटे गुन्हे दाखल केल्याचे उघडकीस आणले आहे.
हेही वाचा – यवतमाळ जिल्ह्यात पावसाने चिंता वाढवली; शेतशिवारात पाणी
अकोट फाइल पोलीस ठाण्यामध्ये २५ सप्टेंबरला वैद्यकीय अधिकारी असलेल्या महिलेने घराकडे जात असताना अज्ञात दोन आरोपीने सहा हजार रोख, सोन्याची आठ ग्रॅम चेन व मोबाइल असा एकूण २१ हजारांचा मुद्देमाल लुटून नेल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी अकोट फाईल पोलिसांनी भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. रात्रीच्या वेळी जबरी चोरीची घटना घडल्याने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना तपास पथकाद्वारे गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याचा वेगवेगळ्या पातळीवर व तांत्रिक विश्लेषण करून तपास सुरू केला. घटनाक्रम संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार महिलेला विश्वासात घेऊन कौशल्यपूर्वक विचारपूस केली. त्यावर तक्रार महिलेने बनाव करून खोटा गुन्हा दाखल केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्ह्यातील सोन्याची चेन व रोख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीने समक्ष हजर केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स.पो.नि. कैलास भगत, पो.उप.नि. गोपाल जाधव व पथकाने केली.
हेही वाचा – पती-पत्नीची दहा लाखांनी ऑनलाईन फसवणूक, सायबर गुन्हेगाराने दिले कॅनडात नोकरीचे आमिष
खोटी व बनावट तक्रार देऊन फिर्यादीने पोलिसांची दिशाभूल करू नये. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. या प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. – शंकर शेळके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला.