गोंदिया : कुख्यात बुकी सोंटू (अनंत) नवरतन जैन याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर आणि त्याच्या मोबाइलमधील डेटा मिळाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. याच डेटाच्या आधारावर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी गोंदिया येथील डॉ. गौरव बग्गा व अक्सिस बँकेचे व्यवस्थापक अंकेश खंडेलवाल यांच्यावर कारवाई केली. तर मोबाइल डेटामध्ये सोंटू जैनने आर्थिक व्यवहार केलेल्यां अनेकांची नावे समोर आल्यामुळे अनेकांची झोप उडाली असून त्यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी त्यांनी वकिलांशी संपर्क साधून हातपाय मारण्यास सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑनलाइन गेमिंग प्रकरणात सोंटू उर्फ अनंत जैनला न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. शनिवारी त्याची पोलिस कोठडी समाप्त झाल्यामुळे गुन्हे शाखेने त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सोंटूला २७ पर्यंत पोलिस कोठडी दिली. आता सोंटूला पुन्हा पोलिस कोठडी मिळाल्याने त्याच्याशी निगडित अनेकांची झोप उडाली आहे.सोंटू जैनने सट्ट्याच्या माध्यमातून गोळा केलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि त्यातून जमवलेली स्थावर मालमत्ता खरेदीत गुंतविली. शिवाय गोंदिया येथे नातेवाइकांच्या नावाने एक मोठे हॉटेलसुध्दा उघडले असल्याची चर्चा आहे. तर सट्ट्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल करण्यासाठी सोंटूने आपल्या अनेको परिचितांचे बँक खाते पैशाचे व्यवहार करण्याकरिताभाड्याने घेतले होते.

हेही वाचा >>>“लक्षात ठेवा, २०२४ च्या निवडणुकीत भावना भडकावून…”; मोहन भागवत यांच्या सूचक वक्तव्याची जोरदार चर्चा

याच खात्यावरून तो हे सर्व आर्थिक व्यवहार करीत असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आली आहे .दरम्यान, आता पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविल्याने भाड्याने खाते देणारे सुध्दा अडचणीत आले आहेत. तर सोंटूला या सर्व प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी गोंदियातील एका तरुण नेत्याने भरपूर धडपड केल्याची चर्चा गोंदियातील गोरेलाल चौक, दुर्गा चौक, गांधी चौक ,गोयल चौक ,नेहरू चौक आदि गोंदियातील प्रमुख चौकात असणाऱ्या तरुणांच्या कट्ट्यात चांगलीच रंगत आहे. शनीवारी डॉ. गौरव बग्गा यांच्यावरील कारवाईनंतर सोंटूशी निगडित अनेकांनी काही दिवसांसाठी आपला मुक्काम काहींनी जवळील ग्रामीण भागात तर काहींनी दुसऱ्या शहरात हलवून सिमोलंघन केल्याचे कळले आहे.सोंटू जैन ने तीन महिने पूर्वी त्याच्या घरावर झालेल्या छापा कारवाईपूर्वी गोंदिया शहरातील मरारटोली परिसरात ४० कोटी रुपयांची जमीन खरेदी केली होती.तसेच सोंटूने गोंदियासह लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सुध्दा आपल्या जवळील नातेवाईक यांच्या नावे जमीन खरेदी केल्याची चर्चा संपुर्ण गोंदिया जिल्ह्यात सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking facts came after buki sontu jain was interrogated by the police and his mobile data was recovered sar 75 amy