नागपूर : पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, लिलाधर आणि संजय दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. लिलाधर आणि संजय एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते. ते नेहमी सोबत दारू पित होते. ४ आॅक्टोबरला लिलाधर टंडन हा संजय ठाकरेच्या घरी धडकला.
दारु पिण्यास येण्यास नकार दिल्यामुळे त्याने संजयला पत्नी व मुलीसमोर शिवीगाळ केली. याचा राग संजयने मनात धरून ठेवला. संजय हा ट्रक ड्रायव्हर आहे. तो ५ आॅक्टोबरला लिलाधर याच्या घरी गेला. एक दुचाकी आणायची आहे म्हणून त्याला सोबत घेतले. रस्त्यात दारू खरेदी केली आणि येथून संजय त्याला थेट त्याच्या शिवशंभूनगर येथे राहणाऱ्या त्याच्या पूजा नावाच्या प्रेयसीच्या घरी घेऊन गेला. पूजाने त्यांना पाणी आणि शेंगदाने भाजून दिले. दोघेही घराच्या छतावर दोघेही दारू पिण्यासाठी गेले. यादरम्यान, लिलाधरने पूजासोबत असलेल्या अनैतिक संबंधावरुन संजयला शिवीगाळ केली. त्यामुळे विषय चिघळला.
हे ही वाचा… रामझुला हिट अँड रन प्रकरण: अखेर रितिका मालूला पोलीस कोठडी…
यातून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी, संजयने धारदार शस्त्राने लिलाधरच्या गळ्यावर, मानेवर तसेच अनेक ठिकाणी वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. यानंतर त्याला छतावरुन थेट खाली फेकून दिले. यात त्याचा मृत्यू झाला.
प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे चिडलेल्या युवकाने मित्राचा प्रेयसीच्या घराच्या छतावरुन फेकून खून केला. ही थरारक घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. लिलाधर रवी टंडन (२४, रा.भवानीनगर, पारडी) असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. पारडी पोलिसांनी आरोपी संजय दशरथ ठाकरे (भवानीनगर) याला दोन तासांत अटक केली.
प्रेयसीच्या भूमिकेवर संशय
संजयची प्रेयसी पूजा ही विधवा असून तिला दोन मुले आहेत. विवाहित संजय याने तिला आर्थिक आधार दिला होता. पूजाच्या घराच्या छतावर लिलाधर याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. लिलाधर दारुच्या नशेत असल्यामुळे प्रतिकार करु शकला नाही. त्याचा खून करण्यात आल्यानंतर पूजाने पोलिसांना माहिती दिली नाही. तसेच लिलाधरचा छतावरुन पडून मृत्यू झाल्याची खोटी माहितीसुद्धा पोलिसांना दिली. त्यामुळे संजयच्या प्रेयसीचीही भूमिका संशयास्पद दिसत आहे.
हे ही वाचा… अकोल्यात दोन गटात वाद; दगडफेक, वाहनांची जाळपोळ
अपघात झाल्याचा केला बनाव
खून केल्यानंतर संजयने लिलाधर याचे वडिल रवी टंडन यांना भ्रमणध्वनी केला. लिलाधरचा अपघात झाल्याचे सांगितले. लिलाधरला उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार रणजीत सिरसाठ यांनी घटनास्थळ गाठले. तेथे अपघात झाल्याचा बनाव रचल्याचे लक्षात आले. संजय ठाकरे हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली.