चंद्रपूर : प्रेम प्रकरणातून दोघांनी मिळून एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना पडोली पोलिस ठाण्याच्या अंतर्गत छोटा नागपूर रोड पाइपलाइनजवळील पटेल वीटभट्टीच्या मागील बाजूला घडली. विशाल उर्फ विश्वास अमर पाटील (वय १७ वर्षे) याचा खून करून मृतदेह राखेमध्ये पुरण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या आठ तासांत दोन आरोपींना अटक केली.
नेहरू कॉलेज, घुटकला येथे वास्तव्यास असणाऱ्या मृतक विशाल पाटील या अल्पवयीन मुलाचे एका मुलीवर प्रेम होते. त्याच मुलीवर आरोपीसुद्धा एकतर्फी प्रेम करीत होता.आरोपीने विशालचा काटा काढण्यासाठी समझोता करण्याच्या बहाण्याने छोटा नागपूर परिसरात बोलावले. त्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणामध्ये आरोपींनी विशालची शुक्रवारी रात्री हत्या केली.
हेही वाचा >>> “गडकरींचा कायकर्त्यांना सल्ला” म्हणाले, “आपले-आपले करू नका, विरोधी विचारांच्याही….”
ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून मृतदेह राखेन दाबून ठेवण्यात आला. मुलगा शुक्रवार पासून घरी परत आला नाही अशी तक्रार कुटुंबीयांनी करताच शोध सुरू झाला. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विविध पथके तयार केली. घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले. गोपनीय माहिती काढून प्रथम मृताची ओळख पटविण्यात आली. दरम्यान, तपासात सर्व गोष्टी उघड झाल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली आहे.