चंद्रपूर: प्रेमसंबंधात आडकाठी ठरत असलेल्या पत्नीच्या प्रियकराने पतीला दारू पार्टीला बोलावले. पती देखील पार्टीसाठी गेला. मात्र तिथे अघटीत घडले. पत्नीच्या प्रियकराने शस्त्राने अतिशय निर्घुणपणे पतीची हत्या केल्याची अतिशय धक्कादायक घटना शुक्रवार (दि. २५) सुमठाणा येथे उघडकीस आली.
नितेश किसन निमकर (३३, रा. सुमठाणा) असे मृतक पतीचे नाव आहे. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी आरोपी प्रियकर नंदकिशोर चरणदास सोयाम (२५, रा. सुमठाणा) याला अटक केली आहे.
मृतक नितेश निमकर याचे वडील किसन निमकर (५६) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी नंदकिशोर सोयाम याचे मुलाची पत्नी हिचे सोबत प्रेमसंबंध होते. गुरुवारी (दि. २४) रात्री नऊ वाजता मुलगा मृतक नितेश याला आरोपी नंदकिशोर सोयाम याने दारू पार्टी करू म्हणून भ्रमणध्वनी वर संपर्क साधून एका ठिकाणी बोलविले. पार्टीला जायचे आहे, म्हणून करून नितेश हा (एमएच ३४ एई ६३२८) क्रमांकाच्या दुचाकीने घराबाहेर पडला. मात्र, रात्री उशीर झाला तरी घरी परत आला नाही. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली.
दरम्यान, मुलगा नितेश हा गावाच्या बाहेर एका निर्जनस्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती काही ग्रामस्थानी कुटुंबियांना दिली. घटनास्थळी जाऊन पाहिले असता नितेश हा रक्ताच्या थारोळ्यात मृत पडून असल्याचे आढळून आला.
दरम्यान त्याच्या डोक्यावर प्रहार करून हत्या करण्यात आली, अशी तक्रार वडिलाने पोलिसात केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी नंदकिशोर सोयाम याच्याविरुद्ध कलम १०३ (१) गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास ठाण्याचे प्रभारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनात एपीआय रमेश नन्नावरे करीत आहेत. दरम्यान या प्रकरणी पत्नीही दोषी असून तिला देखील अटक करण्यात यावी अशीही मागणी केली आहे.