नागपूर : दोन मुली असताना तिसरीही मुलगी झाल्याने दाम्पत्याला ती नकोशी झाली. बाळ विक्री करणाऱ्या श्वेता खानच्या टोळीने या दाम्पत्याला हेरले. नऊ दिवसांच्या चिमुकलीचा सौदा अडीच लाखांत छत्तीसगडमधील धनाढ्य दाम्पत्याशी करण्यात आला. मात्र, गुन्हे शाखेने या टोळीचे आणखी एक कृत्य उघडकीस आणले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथील एका दाम्पत्याला दोन मुली असताना तिसरीही मुलगी झाली. पालनपोषण शक्य नसल्याने त्यांनी बाळ कुणालातरी दत्तक देण्याचे ठरवले. त्या प्रसूत मातेला आरोपी सीमा भीम चापरिया हिने हेरले. सीमा ही तोतया नर्स असून ती बाळ विक्री करणाऱ्या श्वेता ऊर्फ आयेशा आणि मकबुल खान यांच्या टोळीत काम करते. तिने मुलगी दत्तक देत असल्याचे भासवले व थेट श्वेताचे घर गाठले. रायपूर छत्तीसगड येथील व्यापारी दाम्पत्याला अडीच लाख रुपयांमध्ये मुलगी देण्याचे ठरले.

हेही वाचा >>> भाजीपाला विक्री करून काव्यनिर्मितीचा ध्यास; साहित्य साधनेबद्दल रामदास कोरडे यांना दहावा पुरस्कार जाहीर

बुटीबोरी शहरातील एका पेट्रोल पंपाजवळ श्वेताला पैसे देण्यात आले. ते पैसे श्वेता खान, मकबुल खान, सचिन पाटील आणि सीमा चापरिया यांनी आपसात वाटून घेतले. हा गुन्हा एएचटीयूने उघडकीस आणला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक रेखा संकपाळ, समाधान बजबळकर, लक्ष्मीछाया तांबुसकर, ज्ञानेश्वर ढोके, राजेंद्र अटकाळे, मनीष पराये आणि ऋषिकेश डुंबरे यांनी केली.

हेही वाचा >>> ‘समृद्धी’वर माशांचा खच! मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड

अशी आली घटना उघडकीस

मानवी तस्करी विरोधी पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांनी श्वेता खानला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत छत्तीसगडच्या व्यापाऱ्याशी श्वेताची चॅटिंग झाल्यामुळे संशय आला. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला. श्वेताने आणखी एक बाळ विक्री केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या बाळाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही तोतया डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

Story img Loader