प्रशांत रॉय, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: गोमूत्रात ‘ई-कोलाय’सह १४ प्रकारचे हानिकारक जिवाणू असतात. त्यामुळे थेट गोमूत्र प्राशन करणे मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकते, असा दावा बरेलीच्या पशुविज्ञान संस्थेतील संशोधकांनी केला आहे. हे संशोधन संस्थेला सादर करण्यात आले असून ‘ऑनलाईन’ संकेतस्थळावरही प्रकाशित करण्यात आले आहे. या धक्कादायक निष्कर्षामुळे गोमूत्रावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

भारतीय पशु संशोधन संस्था (आयव्हीआरआय) ही देशातील पशूंबाबत संशोधन करणारी नामांकित संस्था आहे. येथील भोज राज सिंग यांच्यासह तीन ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले आहे. या संशोधन अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, भारतात गोमूत्र जरी पवित्र मानले गेले असले तरी थेट मानवी सेवनास ते योग्य किंवा सुरक्षित नाही.

गाय, म्हैस, बैलांच्या मूत्रात बरेच हानिकारक जिवाणू असतात. हे जिवाणू सरळ माणसाच्या पोटात जाऊन विविध रोग, आजारांचे संक्रमण वाढवू शकतात.

दरम्यान, यावर काही जाणकारांनी मत व्यक्त केले की प्रक्रियायुक्त गोमूत्र जिवाणूरहित असल्याने त्याचा अपाय संभवत नाही. मात्र, या संदर्भात आणखी संशोधन सुरू असून त्याचे निष्कर्ष लवकरच प्रकाशित करण्यात येतील.

हिंदू धर्मात गोमूत्र पवित्र मानले जाते. ते घरातील अंगणात शिंपडल्यास वातावरणातील घातक घटक नष्ट होतात, असे मानले जाते. तसेच घरी काही मंगल कार्य असल्यास गोमूत्र शिंपडण्याची प्रथा पाळली जाते.

प्रतिजैविक म्हणून म्हशीचे मूत्र जास्त प्रभावी

गायी, म्हैस व बैलांच्या मूत्र नमुन्यांची तपासणी केली असता गायींपेक्षा म्हैसवर्गीय जनावरांच्या मूत्रात जिवाणूविरुद्ध लढण्याची क्षमता, गुणधर्म (ॲन्टीबॅक्टेरिअल ॲक्टिव्हिटी) जास्त आढळली. त्यामुळे प्रतिजैविक म्हणून म्हशीचे मूत्र जास्त प्रभावी असल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

उपकारक व अपायकारक असे दोन्ही प्रकारचे जिवाणू सर्वत्र आढळतात. जनावरांचे जनुकीय गुणधर्म, त्यांना दिला जाणारा पौष्टिक हिरवा चारा व स्वच्छता या बाबी महत्त्वपूर्ण आहेत. यावर आणखी अभ्यास, संशोधन होणे गरजेचे आहे. -डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगुरू, कृषी विद्यापीठ, अकोला.

हे संशोधन प्रक्रियायुक्त गोमूत्रावर (डिस्टिल काऊ युरीन) करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचे सामान्यीकरण करता येणार नाही. -डॉ. गौतम भोजणे, सहा. प्राध्यापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

करोनानंतर परिस्थिती वेगाने बदलत आहे. गायींमध्ये ‘ब्रूसेलोसिस’, ‘लम्पी’ सारखे आजार बळावत आहेत. त्यामुळे गोमूत्र शक्यतो उकळून, कपड्यांची आठ घडी करून पारंपरिक पद्धतीने गाळून घेतले पाहिजे. तत्पूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांच्या सल्ला गरजेचा आहे. -सनद कुमार गुप्ता, सचिव, गोविज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking researchers claim 14 types of harmful bacteria in cow urine pbr 75 mrj