लोकसत्ता टीम

भंडारा : अवैधरित्या सुरू असलेली रेती, खनिज वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनातून सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांनी तहसीलदाराना केली. मात्र या निवेदनात “घाट चालवताना महसूल मंत्र्यांपासून गृहमंत्र्यांपर्यंत” सर्वांना देणे-घेणे करावे लागत असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आल्याने खळबळ उडाली.

त्यानंतर अवैध रेती तस्करी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आणि अवैध वाळू तस्करी कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? अवैध रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या कारवाई न करता कुणाच्या एका कॉलवर सोडून दिल्या जातात? राजरोसपणे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांचा वाली कोण ? अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या वाळू तस्कराना एका आमदाराचे अभय असल्याच्या चर्चा परिसरात रंगू लागल्या आहेत.

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा, बावनथडी आणि सूर नदीपात्र रेती तस्करांसाठी वरदान ठरत आहे. मोहाडी, तुमसर, पवनी या तालुक्यांतील चंदेरी रेतीला नागपूर आणि परजिल्ह्यातील बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे निलज बुज, बेटाळा, चारगाव, मोहगाव देवी, देव्हाडा, नेरी, करडी मुंढरी असे अनेक रेती घाट या तस्करांसाठी सोन्याची खाण ठरत आहेत. साम, दाम, दंड, भेद वापरून रेतीची तस्करी केली जाते.

प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करून मोठा गाजावाजा केला जातो. मात्र प्रत्यक्षात महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत दिवस-रात्र रेतीची तस्करी सुरू आहे.

या रेती चोरीत जिल्ह्यातील काही नेत्यांच्या खास लोकांसह एका आमदाराचा सिंहाचा वाटा असून यांनीच धुमाकूळ घातल्याचा चर्चा आहेत. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या पोलिसांनी पकडल्यास ‘त्या’ आमदाराचा एक कॉल येतो व गाड्या कारवाई न करता सोडून दिल्या जातात. या आमदारामुळे रेती तस्करी फोफावली असून रेती माफिया गब्बर असल्याची चर्चा आहे. मौदा येथील एक व्यावसायिक या आमदाराचा खास असून त्यांच्या १० ते १५ गाड्या रोज तुमसर मोहाडी रेती घाटावरून ओव्हरलोड होऊन सर्रास रेती चोरी करतात. दबावतंत्र आणि अर्थकारण यांच्या आधारे प्रशासनाला वेठीस धरून रेती तस्करी केली जात असल्याचे बोलले जात आहे. नदीतून रेतीचा अवैध उपसा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याचा अवैध साठा करून नंतर नागपूरला रेती पुरविली जाते. यातून अनेक रेती माफिया या भागात तयार झाले आहेत. यातूनच काही घटनाही घडल्या.

काही वर्षांपूर्वी या रेती माफियांची पोलीस पथकावर हल्ला करण्यापर्यंत मजल गेली होती. पोलिसांवर हल्ला करून जखमी करणारा मुख्य आरोपी हा मोहाडी तालुक्यातील भाजपचा पदाधिकारी होता. तो या आमदाराचा विश्वासू मानला जातो. त्यामुळे ‘आपले कुणीही काहीच बिघडवू शकत नाही’, या तोऱ्यात त्याने पोलिस पथकावर हल्ला केला होता. रेतीचोरीसाठी या आमदाराचे अभय असल्याने हा धंदा सुसाट सुरू असल्याच्या जोरदार चर्चा परिसरात आहेत.

रेती तस्करीमुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या सुसाट वाहनांमुळे अपघात होऊन अनेकांना जीवही गमवावा लागत आहे. मात्र प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे. दुसरीकडे रेतीच्या टिप्परमुळे चांगले रस्ते उखडले आहेत. धुळीमुळे पिकांचे नुकसान होत आहे. नदी पात्र कोरडे पडले असून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होऊ लागली आहे. अवैध रेती उत्खननामुळे असे गंभीर प्रश्न उद्भवत असताना केवळ काही स्वार्थी राजकारणी आणि नेत्यांमुळे अवैध रेती उत्खनन राजरोसपणे सुरू आहे. यावर अंकुश घालावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Story img Loader