चंद्रपूर : पुरोगामी महाराष्ट्रात महिलाना आता सुरक्षेसाठी झगडावं लागत आहे. दरवर्षी महाराष्ट्रातून ६४ हजार महिला बेपत्ता होतात ही धक्कादायक आकडेवारी आहे. अशा वेळी महिला सुरक्षेसाठी तुटपुंजी तरतूद सरकारने केली यावर काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. महिला सुरक्षेसाठी किमान ५००० कोटींची तरतूद करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

पुणे बस स्थानकात महिलेवर अत्याचार झाला, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात आली जर महिला सगळीकडे असुरक्षित असतील तर मग सुरक्षित कोण? एनसीआरबीची आकडेवारी सांगते महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण दिवसाला १२६ गुन्हे नोंदवले जातात तर बालकांविरोधात दररोज ५५ गुन्ह्यांची नोंद होते. दरवर्षी ६४ हजार महिला महाराष्ट्रातून गायब होतात, त्यांचे काय होते? अशी स्थिती असताना निर्भया योजने अंतर्गत महिला मदत कक्षाच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात फक्त २००० रुपये तरतूद केली आहे. या सरकारला निर्भया फंडचा विसर पडला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते असताना निर्भया फंडचा गैरवापर शिंदे गटाने केला तेव्हा टीका केली होती, आज अजित दादा यांनाच निर्भया फंडचा विसर पडला आहे.

अर्थसंकल्पात महिला सुरक्षेचा उपाययोजनासाठी ८ हजार रुपये दिले आहेत, एक मंत्र्यांच्या कार्यालयात चहा नाश्ता साठी याहून अधिक खर्च होतो अशी टीका वडेट्टीवर यांनी केली. त्यामुळे महिला सुरक्षेसाठी ५००० कोटीची तरतूद करण्यात यावी ही मागणी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ हजार महिला पोलिसांची भरती करणार अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले? महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणावा, अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.

नागपूर इथे हिंसाचार भडकला याप्रकरणी मुख्यमंत्री यांनी चित्रपटाला दोष दिला. पण राज्याच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री संविधानाची शपथ घेऊन द्वेषपूर्ण वक्तव्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते, केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान ,अशी सतत भडकाऊ वक्तव्य केली, त्या मंत्र्याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. छावा कांदबरी अनेक वर्षापूर्वी आली, चित्रपट येऊन पण महिने होऊन गेले, पण नागपूरचा कोरटकर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला यांच्यावर कारवाई होत नाही. समाजात द्वेष तुम्ही पसरवणार आणि सरकार जबाबदारी कशी झटकू शकते. नागपूर मध्ये दगड आले, शस्त्र आली, पेट्रोल बॉम्ब आले असे मंत्री सांगतात मग हे जमा होईपर्यंत पोलिस काय करत होते? हे पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युअर नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

गोसीखुर्द प्रकल्पाला सुप्रमा मिळावा म्हणून प्रस्ताव दिला आहे पण अजूनही कारवाई होत नाही. नवी मुंबई मधील कोंढाणे धरणाचे काम सिडकोला दिले आहे. या धरणाची किंमत ८०० कोटी वरून १४०० कोटी पर्यंत वाढवण्यात आली आहे. एका विशिष्ट माणसाला हे काम देण्यासाठी प्रकल्पाची किंमत वाढवली आहे, या कामाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.महाराष्ट्रात जल जीवन मिशनचे काम रखडले आहे.कंत्राटदार काम अर्धवट सोडून निघून गेले आहेत,हे काम कोण पूर्ण करणार असा प्रश्न जलसंपदा विभागाच्या अनुदान मागण्यांवर चर्चा करताना विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.