लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा : चिखली तालुक्यातील बालकाच्या अपहरण प्रकरणात धक्कादायक ‘ट्वीस्ट’ आलाय! अपहरण करण्यात आलेल्या बालकाची प्रथम गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली. नंतर त्याचा पोत्यात टाकून उकिरड्यात पुरण्यात आले. यावर कळस म्हणजे मृत बालकाच्या सख्ख्या आते भावानेच शांत डोक्यानेच हत्याकांड केले. या घटनेने चिखली तालुक्यासह बुलढाणा जिल्हा हादरला आहे. हे क्रूर हत्याकांड करण्यामागे मारेकरी आतेभावाचा उद्देश काय याचा उलगडा आज बुधवारी, २४ जुलै रोजी संध्याकाळी उशीरा पर्यंत होण्याची शक्यता आहे. याकडे सुन्न झालेल्या समाजमनाचे लक्ष लागले आहे.

मोहम्मद अरहान (वय दहा वर्षे, राहणार अंबाशी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा) असे निष्ठूरपणे हत्या करण्यात आलेल्या बालकाचे नाव आहे. यापूर्वी २२ जुलैला मोहम्मद अरहान याचे अपहरण करण्यात आले होते. खाऊन पिऊन सुखी अशी परिवाराची आर्थिक स्थिती , गावात कुणाशी वैमनस्य, हाडवैर नव्हते. त्यामुळं अश्या परिवारातील निरागस बालकाचे अपहरण कोण आणि का केले असावे? असा प्रश्न नातेवाईक आणि गावकऱ्यांनाही पडला होता. चिखली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वेगाने तपास चक्रे फिरविली.

आणखी वाचा-वर्धा : शब्द नव्हेतर मोती! सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत शर्वरी संघपाल राऊत राज्यात अव्वल

२२ जुलै रोजी सकाळी दहा वाजेपासून अरहान बेपत्ता होता. चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गावकरीच नव्हे तालुक्यातील जनतेमध्ये रोष निर्माण झाला होता. यामुळे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तपासात लक्ष घालण्याचे निर्देश दिले. गुंतागुंतीच्या गुन्हेगारी घटनाचा तपास लावण्यात तरबेज अशी ख्याती असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी( मेहकर) प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संग्राम पाटील यांनी कसून तपास केला.

तपास पथकांनी अंबाशी गावात कसून चौकशी केली. या प्रयत्नांना यश मिळाले. गोपनीय माहितीच्या आधारे एका संशयिताला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. एवढेच नव्हे तर त्याने पोलिसांना अरहान याला पुरलेले ठिकाण दाखवले. पोलिसांनी २३ जुलैच्या रात्री उशिरा अंबाशी येथील झोपडपट्टी परिसरातून चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

आणखी वाचा-“काँग्रेसची अवस्था रंगमंचावरील ‘नाच्या’सारखी”, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची टीका

अरहानचा खून हा त्याच्या सख्ख्या आतेभावानेच केला असल्याची माहिती समोर आली आहे. शेख अन्सार (२२) असे क्रूरकर्मा आरोपीचे नाव असून तो अंबाशी गावातीलच राहणारा आहे. शेख अन्सार याने मामेभाऊ अरहानचा दोरीने गळा आवळून खून केला, त्यानंतर मृतदेह पोत्यात टाकला आणि घराशेजारच्या शेणाच्या उकिरड्यात पुरल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.

अंबाशी हादरले

दरम्यान या क्रूर हत्येने खेडेवजा अंबाशी गाव आणि अरहान चे नातेवाईक हादरले आहे. आतेभावानेच मामे भावाची अशा निर्दयतेने हत्या का केली? हे करत असताना अन्सारचे हात जराशेही कापले नसतील का? असा सवाल विचारल्या जात आहे. चिमुकल्या निरागस अरहानचा खून करण्याचा निर्णय अन्सारने का घेतला? खुनाचे नेमके कारण काय याबद्दल अन्सार अजून पोलिसांजवळ बोलला नाही..आज बुधवारी संध्याकाळपर्यंत खुनाच्या उद्धेशाचा उलगडा होऊ शकते, अशी शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking twist in child abduction case of chikhli cousin murder 10 years old boy scm 61 mrj