नागपूरमधील सभेत चप्पल फेकल्याने गोंधळ; सामान्यांसाठी निधीची अपुरी तरतूद
देशद्रोहाच्या आरोपामुळे चर्चेत असलेल्या ‘जेएनयू’मधील कन्हैयाकुमार या विद्यार्थी नेत्याचा नागपूर दौरा आज दगडफेक, चप्पलफेक, भाषणात व्यत्यय, समर्थन व विरोधातील घोषणाबाजीने गाजला. कन्हैय्याकुमारने त्याच्या भाषणात व नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संघ व भाजपवर जोरदार टीका केली.
कन्हैय्याकुमारचे सकाळी नागपूर विमानतळावर आगमन होताच त्याच्या वाहनावर बजरंगदलाच्या काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यात त्याच्या गाडीचा काच फुटला. त्यानंतर कन्हैय्याकुमारने दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. दुपारी दोन वाजता धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये झालेल्या व्याख्यानादरम्यान सभेत उपस्थित बजरंग दलाच्याच कार्यकर्त्यांनी त्याच्या दिशेने चप्पल भिरकावल्याने गोंधळ उडाला. दोन वेळा अशा घटना घडल्याने भाषणातही व्यत्यय आला. या प्रकरणी पोलिसांनी २१ जणांना अटक केली.
दरम्यान, कन्हैय्याकुमार याने त्याच्या भाषणादरम्यान संघ आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. नागपूरची ओळख संघभूमी म्हणून नव्हे, तर आंबेडकर यांची दीक्षाभूमी म्हणून व्हावी, असे तो म्हणाला. शिष्यवृत्ती किंवा इतर अभ्यासवृत्तींमुळे विद्यार्थ्यांवर खूप पैसा खर्च करण्यात येतो, असा कांगावा केला जातो. मात्र, अर्थसंकल्पातील एक तृतीयांश पैसा केवळ भांडवलदारांचे कर्ज माफ करणे आणि सोयी पुरवणाऱ्यांवर होतो. बाकी जनतेच्या वाटय़ाला अत्यल्प तरतूद केली जाते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर खर्च होणारा निधी वाया जात नाही तर ती उद्याची गुंतवणूक आहे. कारण, शिकून नोकरीस लागणारा नोकरदार भविष्यात देशासाठी कर भरत राहतो. म्हणूनच केंद्रात मनुष्यबळ विकास मंत्रालय आहे, याची जाणीव त्याने करून दिली.
पत्रकार परिषदेत त्याने केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार हे मनुवाद आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. ‘राष्ट्रवादा’च्या नावावर अनावश्यक चर्चा घडविली जात आहे. हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली ब्राम्हणवाद लागू करण्याचा प्रयत्न आहे. राज्यघटना अस्तित्वात असेपर्यंत हे शक्य नाही. असेही कन्हैय्याकुमार म्हणाला. दरम्यान, धम्मनगरीतील १४ एप्रिलच्या उत्साहाचे वातावरण दुषित करण्याचे काम कन्हैया व आयोजकांनी केल्याची टीका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे.

Story img Loader