भंडारा : भंडारा कारागृहात मंगळवारी सायंकाळी ‘शोले स्टाईल’ ड्रामा पहायला मिळाला. कारागृहातील पिंपळाच्या झाडावर चढून एका कैद्याने संपूर्ण कारागृह प्रशासनाला वेठीस धरले. जोरजोराने ओरडून त्याने आत्महत्येचा इशारा दिल्याने कारागृहात एकच खळबळ उडाली. तब्बल दीड तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला झाडाखाली उतरवण्यात प्रशासनाला यश आले. याप्रकरणी भंडारा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक हेमराज सयाम (२०, रा.पलखेडा, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) असे या कैद्याचे नाव आहे. १ जुलै २०१७ पासून तो भंडारा कारागृहात शिक्षा भोगत आहे. गोंदिया न्यायालयातील एका प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे. मात्र, मध्यप्रदेशातील बिलासपूर येथील चोरी प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला बिलासपूर कारागृहात हलवले जाणार होते. त्यासाठी तो पोलीस गार्डची मागणी करत होता.
हेही वाचा >>> नागपूर : उके बंधूंना न्यायालयीन कोठडी , ऑर्थर रोड कारागृहात रवानगी
हेही वाचा >>> नागपूर : महिलेशी मैत्री करून तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मंगळवारी सायंकाळी दैनंदिन दिनचर्येकरिता कैद्यांना कारागृहातील आवारात सोडण्यात आले. त्यावेळी दीपक सर्वांची नजर चुकवून कारागृहातील पिंपळाच्या झाडावर चढला. झाडाच्या टोकावर बसून तो जोरजोराने ओरडू लागला. जोपर्यंत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कारागृहात भेटायला येत नाही, मला बिलासपूरच्या केंद्रीय कारागृहात कायमस्वरूपी वर्ग करण्यासाठी पोलीस गार्ड मिळत नाही, तोपर्यंत मी झाडावरच बसून राहणार. मला जबरीने उतरवण्याचा प्रयत्न केल्यास झाडावरून उडी घेऊन आत्महत्या करेन, असा इशारा तो देत होता. या प्रकारामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच अधीक्षक अमृत आगाशे आणि कर्मचारी तेथे पोहोचले. त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न ते करू लागले. भंडारा शहर पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. त्यानुसार ठाणेदार सुभाष बारसे कारागृहात दाखल झाले. तब्बल दीड तासांच्या प्रयत्नानंतर तो खाली उतरला. याप्रकरणी भंडारा ठाण्यात कारागृह शिपाई हेमराज जसुदकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भादंवि ३०९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलासपूर कारागृहात रवानगी
झाडावर चढून आत्महत्येचा इशारा देणाऱ्या न्यायालयीन बंदी दीपक सयाम याला बुधवारी सकाळी ८ वाजता पोलीस गार्डच्या मदतीने बिलासपूरकडे रवाना करण्यात आले.