-राम भाकरे
महालमधील बडकस चौक हा भाजप नेत्यांचे सकाळी भेटण्याचे प्रमुख स्थान, सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने इच्छुकांची गर्दीही तेथे वाढू लागली. त्याचा त्रास तेथील व्यापाऱ्यांना होऊ लागला. त्यामुळे त्यांनी ‘इच्छुकांनी गर्दी करु नये’ असा फलकच लावला. सध्या या फलकाची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
बडकस चौकात भाजप प्रदेश प्रवक्ताचे कार्यालय आहे. शिवाय माजी महापौर व शहर अध्यक्षांचे निवासस्थानही चौकापासून काही अंतरावर आहे. भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना भेटायचे असेल तर त्याला बडकस चौकात बोलवले जाते. रोज सकाळी येथे कार्यकर्ते, नेत्यांची वर्दळ असते. गप्पा रंगतात.
सध्या महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने अर्थात गप्पांचा विषय हा राजकीयच असतो.कोण कुठून लढणार, कोणता वार्ड राखीव झाला, कोणाला तिकीट मिळणार, कोणाचे नाव कापले जाणार? कोण कुठल्या पक्षात जाणार यावर चर्चा रंगते. यात निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या अधिक असते. या गर्दीची चौकातील व्यापाऱ्यांना अडचण होऊ लागली.
मग व्यावसायिकांचा समावेश असलेल्या ‘बडकस चौक मित्र परिवार’ या संघटनेने एक शक्कल लढवली. या संटनेचे बहुतांश सदस्य भाजपचीच संबंधित. तरीही त्यानी चौकातच ‘या ठिकाणी इच्छुक कार्यकर्त्यानी र्दी करु नये’ असे आवाहन करणारा फलक लावला. या फलकामुळे गर्दी तर कमी झाली नाही. पण त्यांची चर्चा मात्र चांगलीच सुरु आहे.