अकोला : जागतिक स्तरावरील सर्वात मोठा लघु चित्रपट महोत्सव ‘स्टुडंट वर्ल्ड इम्पॅक्ट फिल्म फेस्टिव्हल २०२३’ (स्वीफ) मध्ये ‘मोर्णाकाठचा पांडुरंग’ लघुचित्रपटाला मुख्य सोहळ्यासाठी अधिकृत नामांकन मिळाले आहे. अमेरिकेतील लघुचित्रपट महोत्सवासाठी जगातील सुमारे १२० देशांतील १३ हजार प्रवेशिका आल्या होत्या. त्यात ‘मोर्णाकाठचा पांडुरंग’ची निवड झाली. ‘सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट’ या श्रेणीमध्ये ‘मोर्णाकाठचा पांडुरंग’ नामांकनास पात्र ठरला आहे.
महोत्सवात नामांकनास पात्र ठरलेल्या लघुचित्रपटांचे १८ ते २५ दरम्यान अमेरिकेत ‘स्क्रीनिंग’ होणार आहे. त्यात ‘मोर्णाकाठचा पांडुरंग’ दाखवला जाणार आहे. या लघुचित्रपटाची निर्मिती डॉ. कल्याणी व डॉ. सूर्यकांत कवडे यांनी केली. लघुचित्रपटाची कथा तसेच ‘पांडुरंग’ या गीताचे लेखन निलेश कवडे यांनी केले आहे. ‘मोर्णाकाठचा पांडुरंग’चे दिग्दर्शन डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. या लघुचित्रपटात अकोल्यातील स्थानिक कलावंतांनी काम केले. यानिमित्ताने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची संधी मिळाली आहे.
‘मोर्णाकाठचा पांडुरंग’ हा लघुचित्रपट अकोल्यातील भूमिपुत्र स्व. पांडुरंग कवडे यांच्या जीवन संघर्षावर आधारित आहे. त्यांचा एक गिरणी कामगार ते नगराध्यक्ष हा प्रेरणादायी प्रवास या माध्यमातून साकारण्यात आला. नगरपालिकेचा सुवर्ण काळसुद्धा पडद्यावर झळकला आहे. स्व.पांडुरंग कवडे यांनी १० टक्के लोकवर्गणी माफ करून अकोला शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना महाराष्ट्रात सर्वप्रथम खेचून आणली होती. त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. यापूर्वी ‘मोर्णाकाठचा पांडुरंग’ची ‘वन अर्थ अवॉर्ड फिल्म फेस्टिव्हल’, ‘फर्स्ट टाइम फिल्ममेकर सेशन’, ‘लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क’, ‘नोबल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ आणि ‘रेणुएसी फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली आहे. या लघुचित्रपटाच्या माध्यमातून अकोल्याचा इतिहास अमेरिकेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवल्या जाणार आहे.