नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) निविदा प्रक्रियेत त्रुटी राहिल्याने दोन हजार बसेसची खरेदी प्रक्रिया रखडली आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली. नागपुरात सोमवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. एसटी महामंडळात सध्या १५ हजार ६०० बसेस आहेत. त्यापैकी १४ हजार बसेस रस्त्यांवर धावत आहे. एकूण बसेसपैकी ८ हजारांच्या जवळपास बसेस आठ ते दहा वर्षे जुन्या झाल्या आहेत.
दरम्यान, एसटीने २ हजार बसेस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेत त्रुटी पुढे आल्याने खरेदी प्रक्रिया रद्द केली गेली. दुसरीकडे जुन्या ५ हजार बसेसला एलपीजीवर (द्रवरूप इंधन) बदलण्याचा निर्णय झाला आहे. या प्रक्रियेला वेळ लागेल. पाच हजार इलेक्ट्रिक बसेसही खरेदी केल्या जाणार आहेत. सध्या इलेक्ट्रिक बसेसची मागणी सर्वत्र वाढल्याने या बसेस उपलब्ध व्हायला सुमारे ५ वर्षे लागतील. त्यामुळे येत्या दोन वर्षांनी एसटीकडे बसेसचा तुटवडा होण्याचा धोकाही बरगे यांनी वर्तवला.