अमरावती : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवेवर प्रचंड ताण आला असून जिल्ह्यात वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल पन्नास टक्के पदे रिक्त असल्याचे चित्र आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील जनतेला खासगी रुग्णालयातील उपचारपद्धती परवडत नसल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यावाचून पर्याय नसतो, मात्र सरकारी रुग्णालयात आल्यानंतर रुग्णांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने काहीवेळेला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात रुग्णांना पाठवले जाते. त्यातही रुग्णालयात यंत्रसामुग्रीचा अभाव असल्यास रुग्णांना नागपुरातील रुग्णालयात पाठवले जाते. अशातच डॉक्टरांच्या रिक्त पदामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. रुग्णाला दुसरीकडे हलवताना वेळेत रुग्णवाहिका मिळत नाही. खासगी वाहने उपलब्ध नसतात. त्यामुळे उपचारासाठी विलंब झाल्यामुळे अनेकदा रुग्णाचे प्राणही गेले आहे.

हेही वाचा >>>‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने अडवली ‘मान्सून’ची वाट! काय परिणाम होणार जाणून घ्या…

जिल्ह्याचा प्रचंड विस्तार पाहता सर्व प्रमुख रुग्णालयांतील डॉक्टरांच्या रिक्त जागा तत्काळ भरून रुग्णांना वेळेत सेवा मिळावी, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जिल्हा क्षयरोग रुग्णालय, चार उपजिल्हा रुग्णालये, ९ ग्रामीण रुग्णालये, ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३२ उपकेंद्र, ६७ आयुर्वेदिक दवाखाने आहेत.

हेही वाचा >>>कॉंग्रेसच्या गोंदिया जिल्हाध्यक्षांची हकालपट्टी होणार!, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ८ जून ला गोंदियात

जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालयांमध्ये वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ४१ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात मात्र या रुग्णालयांमध्ये २१ पदे भरलेली असून २० पदे रिक्त असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळालेली आहे. याशिवाय वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण १३३ पदे मंजूर असून १९ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या ६४२ मंजूर पदांपैकी १७५ पदे रिक्त, तर वर्ग ४ च्या ३५४ मंजूर पदांपैकी १२५ पदे रिक्त आहेत.

हेही वाचा >>>Maharashtra News Live: ‘देशात मोदीविरोधी वातावरण’ या पवारांच्या वक्तव्याची फडणवीसांकडून खिल्ली आणि महत्त्वाच्या घडामोडी

जिल्हा सामान्य रुग्णालयातील वर्ग एक व वर्ग दोनच्या डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे उर्वरित डॉक्टरांवरील कामांचा ताण वाढला आहे. तसेच काही डॉक्टरांची बदली झाल्यानेही पदे रिक्त आहेत. त्यामुळे याचा परिणाम हा रुग्णालयातील ‘ओपीडी’मध्येही दिसून येत असल्याचे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी अभ्यासक्रमाचाच एक भाग असल्याने इर्विन रुग्णालयात प्रशिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते; परंतु, रुग्णांच्या संख्येत डॉक्टरांची संख्या कमी असल्याने या विद्यार्थांनाच रुग्णालयातील बहुतांश रुग्ण तपासावे लागत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयावर ताण

जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण २२ पदे मंजूर असताना या ठिकाणी ११ पदे रिक्त आहेत. शस्त्रक्रिया विभागात वैद्यकीय अधिकारी नाही, याशिवाय स्त्रीरोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी चर्मरोग, नेत्रशल्य चिकित्सक, मनोविकृती चिकित्सकांची पदे रिक्त आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shortage of doctors plight of patients fifty percent of the posts of medical officers are vacant mma 73 ysh