लोकसत्ता टीम
अमरावती : विभागात एका विशिष्ट कापूस वाणाची मागणी वाढल्याने या बियाण्याची टंचाई जाणवू लागली असून शेतकरी इतर जिल्ह्यांमधून बियाणे आणू लागले आहेत. विभागात कापूस बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु शेतकऱ्यांनी कापसाच्या विशिष्ट वाणांसाठी आग्रह धरु नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अमरावती विभागात कापूस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १०.३६ लाख हेक्टर आहे. २०२४ च्या खरीप हंगामात १०.७० लाख हेक्टरमध्ये कापूस पिकाची लागवड अपेक्षित आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रति हेक्टर ४.२ पाकीटे बियाण्याची आवश्यकता असते. या क्षेत्राकरीता ५६.९३ लाख पाकीटांची आवश्यकता आहे. विभागात कापूस बियाण्याची कमतरता नाही. मात्र, शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या काही वाणांना विशेष मागणी आहे. परंतु त्याबरोबर इतर कंपन्यांचे कापसाचे वाण सुध्दा अतिशय चांगले उत्पादन देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या ठराविक वाणांचीच मागणी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
आणखी वाचा-चंद्रपूर : तीन दिवसात उष्माघाताचे दहाहून अधिक बळी! माजी आमदार संजय धोटे यांचा आरोप
केंद्र सरकारने खरीप २०२४ साठी कापूस बीजी-२ चा दर ८६४ रुपये निश्चित केला आहे. कापूस बियाणे जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र तसेच कापूस उत्पादक कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) यांचेमार्फत आदेश देण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी कापूस जादा दराने विक्री केली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कृषी विभागातील स्थानिक कृषी सहाय्यक यांच्या मदतीने संबंधित कापूस बियाण्याचे वाटप कृषी विभागाच्या कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन संबंधित जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केलेले आहे.
कापूस बियाणे पाकीटाची जादा दराने विक्री केल्यामुळे अनेक ठिकाणी विक्रेत्यांवर कृषी विभागामार्फत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात तीन ठिकाणी ११३ बियाणे पाकीटे जप्त करण्यात आली असून त्याचे मुल्य १.५५ लाख रुपये इतके आहे. सर्व जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर भरारी पथकांमार्फत मोहीम स्वरुपात तपासण्या करण्यात आल्या असून त्यानुषंगाने दोषींवर कारवाई करण्यात आली आहे, असे कृषी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
आणखी वाचा-७२ वर्षात फक्त एकानेच साधली नागपूर लोकसभेत हॅट्रिक, कोण आहेत ते?
विभागात सर्वाधिक २३.८० लाख कापूस बियाणे पाकिटांची मागणी ही यवतमाळ जिल्ह्यात असून त्याखालोखाल अमरावतीत १५.०६ लाख, बुलढाणा ९.७५ लाख, अकोला ६.७७ लाख तर वाशीम जिल्ह्यात १.५४ लाख पाकिटांची मागणी आहे. विभागात एकूण २६ हजार ३३७ क्विंटल कापूस बियाणे लागणार आहे.
गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या विक्रेत्यांकडून बियाणेखरेदी करावी. बनावट (बोगस) आणि भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी विक्रेत्यांकडून खरेदी पावती घ्यावी. पावतीवरील पीक, वाण, लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, बियाणांची पिशवी मोहरबंद असावी, किंमत, खरेदीदाराचे नाव, पत्ता, विक्रेत्याच्या नावाचा पावतीवर उल्लेख असावा. बियाणे खरेदी-विक्रीत कोणताही गैरव्यवहार दिसून आल्यास, भेसळीची शंका असल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.