इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. इखार नावाच्या परिचारिकेने प्रसंगावधान राखत ९ बालकांना वेळीच बाहेर काढल्याने सर्व बचावले. या घटनेमुळे येथील वीज यंत्रणा एकाच फेजवर असून येथे रात्री एकच परिचारिका ठेवली जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
मेयोच्या एनआयसीयूत ८ खाटा असून त्यावर व्हेंटिलेटर, वार्मर आणि हिटरवर उपचार घेणाऱ्या दहा ते बारा अत्यवस्थ नवजात बालक रोज दाखल असतात. ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री येथील वीज यंत्रणेत शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे वायरमध्ये आग लागून एनआयसीयूत धूर कोंबला. हा प्रकार बघून येथ सेवेत असलेल्या एकमात्र इखार नामक परिचारिकेने आरडा-ओरड करत इतरांना मदत मागितली. एक-एक करत बालकांना एनआसीयूतून बाहेर इतर वार्डात हलवले. पाच बालकांना हलवल्यावर इतर जण मदतीला धावले. सर्व ९ बालक इतरत्र हलवण्यात आले. ही माहिती मेयोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच त्यांचे धाबे दणाणले.
काहींनी तेथे धाव घेतली. तेथे व्हेंटिलेटर, वातानुकूलित यंत्र, हिटर, वॉर्मर ही जास्त वीज ओढणारी यंत्रे असतानाही येथील वीज व्यवस्था सिंगल फेजवर असल्याचे पुढे आले. रात्रपाळीला येथील एनआयसीयूत केवळ एकच परिचारिका ठेवली जात असून एकही मदतनीस (अटेंडन्ट) नसल्याचेही पुढे आले. त्यामुळे येथे भारतीय वैद्यकीय परिषदेच्या अत्यवस्थ बालकांसाठी आवश्यक परिचारिकेच्या नियमांनाही छेद दिले जात असल्याचे स्पष्ट झाले. निकषानुसार येथे प्रत्येक खाटेवर एक परिचारिका आवश्यक आहे.
ऑक्सिजन सिलेंडर ‘एनआयसीयू’तच
वैद्यकीय निकषानुसार, ‘एनआयसीयू’त मोठे ऑक्सिजन सिलेंडर ठेवता येत नाही. परंतु येथे वार्डातच ते ठेवले जात असल्याचा प्रकारही या घटनेमुळे पुढे आला आहे. त्यामुळे आगीसारख्या घटनेत सिलेंडर स्फोटाचा धोका नाकारता येत नाही. दरम्यान, एनआयसीयूतून आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नसून आग लागलेल्या वीज सॉकिटच्या खालूनच परिचारिकासह इतरांना बालकांना बाहेर काढावे लागले.
एनआयसीयू बंद; व्हेंटिलेटरचा वापर अशक्य
मेयोतील ‘एनआयसीयू’तील वीज यंत्रणेची दुरुस्ती सोमवारी सुरू झाली. त्यामुळे हा विभाग आता बंद असल्याने येथील नवजातांसाठीचे व्हेंटिलेटर प्रशासनाला वापरता येत नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या काळात कुणी बालक व्हेंटिलेटरअभावी दगावल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कुणालाही त्रास होऊ देणार नाही
‘‘एनआयसीयू’तील शॉर्टसर्किट प्रकरणाची चौकशी केली जाईल. येथील बालकांना सध्या जवळच्या वार्डात हलवले असून सर्व सुरक्षित आहेत. कुणाही बालकांना उपचारात त्रास होऊ दिला जाणार नाही. येथील वीज यंत्रणा पडताळून बघणार असून आवश्यकतेनुसार त्यात प्रशासन सुधारणा करू.’’
– डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, मेयो.