लोकसत्ता टीम
वर्धा : गणपतीबाप्पाच्या स्थापनेनंतर आता हळूहळू विसर्जनाचे वेध सुरू झाले आहे. कोणी तीन दिवस तर कोणी पाच दिवसाचा गणपती घरी बसवतात. पण बहुतांश दहा दिवसाच्या मुक्कामानंतर बाप्पाचे विसर्जन करतात. धार्मिक विधी या परंपरा, प्रथा, आख्यायिका यातून पाळल्या जातात. यात एक चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे. मूर्तीचे विसर्जन करावे की करू नये.
गणपतीला मोठ्या उल्हासात घरी आणून प्राणप्रतिष्ठा केली. त्याचे विसर्जन करण्याची विचित्र परंपरा कशी पाळल्या जाते, अशी चर्चा होते. बाप्पाला कधीही निरोप देता कामा नये. विसर्जन केवळ महाराष्ट्रातच होते. कारण येथे गणपती एक पाहुणा म्हणून येतो. लालबागचा राजा म्हणून मान्यता असलेल्या कार्तिकेयने आपला भाऊ गणेश याला घरी बोलवून राहण्याचा आग्रह केला. जितके दिवस गणपतीचा मुक्काम राहला तितके दिवस लक्ष्मी तसेच रिध्दी सिध्दीचाही मुक्काम राहल्याने लालबाग धनधान्याने परिपूर्ण राहला. म्हणून कार्तिकेयने गणेशाला लालबागचा राजा म्हणून सन्मान दिला. गणेशाचे विसर्जन केल्यास लक्ष्मीसोबतच रिध्दी व सिध्दीही घरून निघून जाणार. गणेशाला विसर्जीत केल्यास नवरात्री, दिवाळी व अन्य शुभ कार्य कोणाच्या साक्षीने करणार, अशी पृच्छा होते. अशा आशयाचा संदेश व्हायरल होत आहे. त्याचा प्रतिवाद पण केला जातो. म्हणजे आपण गणपतीचे नव्हे तर गणपतीच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन करीतच असतो.
आणखी वाचा-पूर ओसरला, वेदना कायम! नागपुरातील सध्याची स्थिती काय? जाणून घ्या…
लालबागच्या राजाची आख्यायिका आताच पुढे कशी आली. याचे काय प्रमाण आहे, असा सवाल वैदीक साहित्याच्या अभ्यासक प्रा.लतिका चावडा या करतात. विसर्जन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर बहुतांश भागात होते. पुढल्या वर्षी लवकर या असे आवाहन म्हणजे यावर्षी प्रमाणेच पुढील वर्षी पण धडाक्यात स्वागत करणार. यावर्षी मूर्तीचे विसर्जन होणार म्हणजेच मूर्तीकार नव्याने मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायात राहतील. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात गणेशोत्सव एकतेसाठी प्रेरणेचे स्थान राहला. आता प्रेरणा संपली असली तरी धार्मिक उत्सव म्हणून त्याचे स्थान कायम आहे. म्हणून मूर्तीचे विसर्जन वादाचा मुद्दा होत नाही. वर्षभर आपल्या घरी गणेशासह सर्व देवतांचे पूजन होतच असते. विसर्जन केल्याने घरच्या देवाला निरोप दिला असे म्हणने चूकीचे ठरते, असे सार्वमत आहे.