लोकसत्ता टीम
नागपूर : उपराजधानीत तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे लग्न समारंभाची वेळ भर उन्हातली नको. ती सकाळी लवकर वा दुपारनंतर ठेवावी, असे आवाहन नागपूर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले.
लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता ते बोलत होते. डॉ. सेलोकर म्हणाले, सध्या नागपुरातील तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. ते काही दिवसांत ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. लग्नांचा हंगाम आहे. बऱ्याच ठिकाणी भर दुपारी वरात निघताना दिसते. नातेवाईक बँडच्या तालावर थिरकताना दिसतात. हे धोकादायक आहे. कारण, उन्हाळ्यात शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्यास उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे उन्हात लग्नाची वरात टाळावी. लग्नात उपस्थितांसाठी शुद्ध पाणी हवे. जेवणाची व्यवस्था उन्हात नको. उष्माघात टाळण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर वैद्यकीय संघटनांसोबत समन्वय साधून काम करीत आहे. बेघरांसाठी महापालिकेचे निवारागृह सुरू केले आहेत. पाणपोईही सुरू झाल्या आहेत. कामगारांना उन्हापासून वाचवण्यासाठी शक्यतो दुपारी काम बंद करून सकाळी व संध्याकाळी अशा दोन पाळीत काम करण्याचे आवाहन केले जात आहे, असेही सोलोकर म्हणाले.
आणखी वाचा-नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
उष्माघाताची लक्षणे काय?
डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे, बेशुद्ध पडणे, अशक्तपणा जाणवणे, नाडी असामान्य होणे यासह प्रौढ व्यक्तींमध्ये दिशाभूल, चिडचिड, गरम, लाल आणि कोरडी त्वचा, डोकेदुखी ही उष्माघाताची लक्षणे आढळतात. मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, अतिचिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी, तोंड कोरडे पडणे, शुष्क त्वचा आणि अश्रू न येणे, सुस्ती ही लक्षणे आढळतात, असे डॉ. सेलोकर यांनी सांगितले.
काय काळजी घ्याल?
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी हलवावे. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा. वारा घालावा. व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवावे. कपडे सैल करावेत. द्रवपदार्थ, कैरीचा पन्हा पाजावा. बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या वा नागपूर महापालिकेच्या, शासकीय रुग्णालयात घेऊन जावे, असेही डॉ. सेलोकर म्हणाले.
आणखी वाचा-उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर कोणी टाकले विरजण? तर्कवितर्क सुरू…
ताजे व हलके अन्न हवे
अतिउष्णतेच्या परिस्थितीत भरपूर ताजे व हलके अन्न खाल्ल्यानंतरच घराबाहेर पडा. फळे आणि सलाद पचायला हलके असते. ते खावे. पातळ, सैल, सुती, आरामदायी शक्यतो फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. उन्हात जाताना डोके झाकावे. भरपूर पाणी, ओ. आर. एस. पाण्याचे द्रावण, ताक किंवा लस्सी, लिंबूपाणी, पन्हा हे घरगुती पेय घ्यावे. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर यासारखे उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात, असेही डॉ. सेलोकर यांनी सांगितले.
नागपूर महापालिकेने शहरातील विविध झोनमध्ये ३३८ पाणपोई सुरू केल्या आहेत. सोबतच विविध उद्यानात १६७ पाणपोई, ४०० बेघरांची सोय होईल असे निवारागृहही सुरू झाले आहे. महापालिकेचे रुग्णालय, मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयांमध्ये शीतवार्ड सुरू करण्यात आले आहेत. येथे सुमारे १०० रुग्णशय्यांची सोय आहे. सगळ्या आवश्यक औषधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. -डॉ. दीपक सेलोकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नागपूर महापालिका.