लोकसत्ता टीम
नागपूर : नीट परीक्षा सातत्याने वादात सापडली आहे. सुरुवातीला नीट परीक्षेतील प्रश्न लीक झाले असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले आणि प्रश्न फुटल्याची बाब उघड झाली. आता यंदा झालेल्या ‘नीट’ परीक्षेत अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न विचारण्यात आल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. संबंधित विषय ‘एनसीईआरटी’च्या बारावीच्या पुस्तकात नाही, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. यावर एनसीईआरटीच्या पुस्तकात नीट परीक्षेसाठी अधिकृत स्त्रोत आहेत का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजेन्सीला (एनटीए) केली आहे. एनटीएला याबाबत दोन दिवसात उत्तर सादर करायचे आहे.
शौरीन आंबटकर या विद्यार्थ्याने याबाबत ३ ऑगस्ट रोजी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. अविनाश घरोटे आणि न्या. एम.डब्ल्यू. चांदवानी यांच्या खंडपीठासमक्ष शुक्रवारी सुनावणी झाली. मागील सुनावणीत न्यायालयाने याप्रकरणात दोन विषय समित्या नेमण्याचे आदेश दिले होते. या समितीत व्हीएनआयटी,एलआयटी सारख्या नावाजलेल्या संस्थेतील प्राध्यापकांचा समावेश होता.दोन्ही समित्यांनी शुक्रवारी न्यायालयात अहवाल सादर केला.
आणखी वाचा-वसतिगृहांबाबत मोठा निर्णय, विशेष कोटा न्यायालयाने केला रद्द
नीट परीक्षेत भौतिकशास्त्र विषयातील ‘रेडिओॲक्टिव्ह डिके’बाबत विचारण्यात आलेला प्रश्न अभ्यासक्रमातीलच आहे, असा अहवाल भौतिकशास्त्र विषयातील तज्ज्ञ समितीने दिला. याचिकाकर्त्याने हा अहवाल मान्य केल्याने न्यायालयाने या विषयातील प्रश्नाबाबतची याचिका निकाली काढली. दुसरीकडे, वनस्पतीशास्त्र विषयातील प्रश्न चुकीचा असल्याचा दावा याचिकाकर्त्या विद्यार्थ्याने केला होता. मात्र वनस्पतीशास्त्रातील तज्ज्ञ समितीने हा प्रश्न बरोबर असल्याचा दावा केला. यावर याचिकाकर्त्याने युक्तिवाद केला की, संबंधित प्रश्न हा बारावीच्या ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकात नाही. यावर एनटीएने प्रतिवाद केला की, त्यांच्याकडून केवळ अभ्यासक्रम सांगितला जातो. त्या अभ्यासक्रमासाठी कोणते पुस्तक वाचावे, ते सांगण्यात येत नाही.
उच्च न्यायालयाने ‘एनटीए’ला ही माहिती लिखित स्वरूपात दोन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले. १२ ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. ‘नीट’च्या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयातील ‘रेडिओॲक्टिव्ह डिके’बाबत विचारण्यात आलेला प्रश्न क्रमांक ११ अभ्यासक्रमाबाहेरील होता. याशिवाय वनस्पतीशास्त्र विषयातील प्रश्न क्रमांक १४८ देखील अभ्यासक्रमाबाहेरचा होता, असा दावा करून या प्रश्नाच्या मोबदल्यात याचिकाकर्त्या विद्यार्थ्याला प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण प्रदान करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अशाचप्रकारची एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच फेटाळली.
© The Indian Express (P) Ltd