वर्धा : महादेव भक्त मंडळींनो, मी बेलाचे झाड. आज श्रावण सोमवार म्हणून कालपासून मला ओरबाडणे सुरू झाले. भक्ता, माझी पाच पाने वाहल्याने पूजा पूर्ण होत नाही का. प्रत्येकाने १११ पाने वाहली पाहिजेच का ? मी एक जीवच असल्याचे भान ठेवल्यास सृष्टीस किती आनंद होईल. तुम्ही किती पाने वाहू, किती नाही असे करीत माझ्या फांद्याच तोडतात. जणू माझे हात पायच छाटतात. काही तर कुऱ्हाडीने घावच घालतात. पण अश्याने माझ्या कुळाचा नायनाट होत आहे, हे कुणी का लक्षात घेत नाही. सतत तोड केल्याने मला फुलच येणार नाही. म्हणून मग फळपण लागणार नाही.
हेही वाचा – Weather Updates: मान्सूनच्या परतीची तारीख ठरली; लहरीपणा मात्र कायम!
मग वन्य जिवांसोबतच तुमचे कसे होणार, याचा विचार करावा. आमचा जन्म केवळ देण्यासाठी आहे. ऑक्सीजन, फळे, फुले, घरटी, सावली, पर्जन्य या बाबी आमच्याशी निगडित आहे नं! असंख्य पाने वाहल्यानेच देव पावतो का, हे लक्षात घ्या. महादेव तुम्हास सद्बुद्धी देवो. पुढे दसरा, दिवाळी आहे. पळस, आंबा ओरबाडून काढू नका. श्रावण पाळा पण मला पण जपा.