चंद्रपूर : चिमूर येथील बालाजी महाराज मंदिराला व घोडा यात्रेला ३९७ वर्षाच्या इतिहासाची परंपरा आहे. श्री बालाजी महाराज मंदिराला महाराष्ट्राचा तिरुपती बालाजी म्हणून ओळखले जाते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत चिमूर येथे श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान ठरले आहे तर विदर्भातील भाविकासाठी चिमूरची घोडा रथयात्रा श्रद्धेसह आकर्षण ठरत आहे. ही यात्रा सलग पंधरा दिवस चालत असून वसंत पंचमीला यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेसाठी विदर्भातील लाखो भाविक हजेरी लाऊन दर्शन घेतात.
जानोजी भोसले यांनी पेशव्यांचे सरदार देवाजी पंत चोरघडे यांच्या विनंतीठरून इ.स.१७५० मध्ये चिमूर येथे २०० एकर जमीन मंदिर उभारणीसाठी दिली. तटबंदीयुक्त असलेल्या मंदिराला उंच प्रवेशद्वार असून त्यावर कोरीव काम केले आहे. लाकडी सभामंडपात १२ खांब असून त्यावर हत्ती, वाघ, अशा प्राण्यांचे चित्र कोरल्या गेली आहेत. त्यापुढे चार दगडी खांब असलेला एक सभामंडप आहे. त्याला वर आधारशीला बसविलेल्या आहेत. श्रीहरी बालाजी मूर्ती बऱ्याच प्रमाणात तिरुपती बालाजीच्या मूर्तीसारखीच आहे. मंदिराच्या आवारात एक गरुड खांब असून बाहेर काही पुजारी मंडळीच्या समाध्या बांधलेल्या आहेत.
‘रात घोडा’ असते आकर्षण
महाराष्ट्राचे तिरुपती या नावाने प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे चंद्रपूर जिल्हयातील चिमूरचे श्रीहरी बालाजी देवस्थान, या प्रसिद्ध मंदिरात दरवर्षी मिनी माघ शुद्ध पंचमीला नवरात्र प्रारंभ होते. मिनी माघ दयोदशीला रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत भव्य लाकडी घोड़ा रथावरून श्रीहरी बालाजी महाराजाच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीला रात घोडा असे संबोधण्यात येते. या रात घोड्याला पंचक्रोशीतील लाखो भाविक हजेरी लाऊन बालाजी महाराजांचे दर्शन घेतात तर तिसऱ्या दिवशी दुपारी १२ ते ३ वाजता गोपाल काला करून मुख्य यात्रेची समाप्ती करण्यात येते.
अशी आहे आख्यायिका
इ.स. १७०४ मध्ये चिमूर येथील शेतकरी भीकुजी डाहुले पाटील यांनी जनावराच्या गोठ्यासाठी जमीन खोदायला सुरुवात केली. त्यामध्ये एका ठिकाणी कुदळ मारताच धातूसारखा आवाज आला तेव्हा भीकू पाटील यांनी खोदकाम थांबविले. त्याच रात्री त्यांना स्वप्न पडले च स्वप्नानुसार आणखी त्यांनी खोदकाम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना खोदकामामध्ये एक सुंदर मूर्ती वर आलेली दिसली, अशी आख्यायिका आहे.
वसंत पंचमीपासून यात्रा महोत्सव
वसंत पंचमी म्हणजे २ फेब्रुवारीला घोडा रथ यात्रा प्रारंभ झाली असून यादरम्यान स्नेहल पित्रे महाराज यांचे रात्री ८ ते १० वाजता नारदीय कीर्तन होणार आहे. १० फेब्रुवारीच्या रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत घोड्याची मिरवणूक निघणार आहे. १३ फेब्रुवारीला दुपारी १२ ते ३ वाजता गोपाल काला कीर्तन करून मुख्य यात्रेची सांगता होत असली तरी हा यात्रा महोत्सव महाशिरात्रीपर्यंत चालणार आहे.
चिमूर क्रांती भूमीतील जगप्रसिद्ध घोडा यात्राची महती सर्वदूर गेली पाहिजे म्हणून आमदार बंटी भांगडिया यांच्या संकल्पनेतून चिमूर घोडा यात्रा उत्सव समिती तर्फे सतत पाच दिवस भव्य दिव्य असा कार्यक्रम चिमूर क्रांती भूमीत यावर्षी रंगणार आहे. सोमवार १० फेब्रुवारी रोजी रात्री इशरत जहाँ यांचा भव्य रोड शो निघणार आहे. श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा चिमूर निमित्त “चिमूर घोडा यात्रा महोत्सव” २०२५ असा असणार असुन, सदर घोडा यात्रा महोत्सवाला १० फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून सायंकाळी ७ वाजता भगवा रंग चढणे लगा फेम इशरत जहाँ यांचा रोड शो,१३ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता आंतरराष्ट्रीय गरबा गायिका गीताबेन रब्बानी यांचा लाईव्ह कन्सर्ट शो,१५ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांचा लाईव्ह कन्सर्ट शो,१६ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता वैभव गुघे व सोम्या कांबळे यांच्या उपस्थितीत नॅशनल लेव्हल डान्स कॉम्पिटिशन आणी १७ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता आंतरराष्ट्रीय कवी कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत कवी संमेलन असा अनोखा कार्यक्रम रंगणार आहे.
सदर कार्यक्रमाला १५ हजार लोकांना बसण्याची व्यवस्थित व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रम पहिल्यांदाच भव्य दिव्य असा कार्यक्रम चिमूर क्रांती भूमीत होत असून या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी शांततेत मनमुराद आनंद लुटवा या कार्यक्रम प्रसंगी पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तरी चिमूर विधानसभा क्षेत्रांतील नागरीकांना शांततेत कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन आपलाच कार्यक्रम समजून सहकार्य करण्याचे आवाहन आमदार बंटी भांगडिया व चिमूर घोडा यात्रा उत्सव समितीचे समीर राचलवार, संजय नवघडे, बंटी वनकर, श्रेयस लाखे, अमित जुमडे, गोलू मालोदे, सचिन डाहुले व इतर पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे