नागपूर : नागपुरातील प्राचिन पोद्दारेश्वर राम मंदिरतर्फे श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा ६ एप्रिलला दुपारी ४ वाजता मंदिरातून निघणार आहे. शोभायात्रेचे मोमीनपुरासह चार ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून स्वागत केले जाईल. या शोभायात्रेत सर्व धर्मिय सहभागी होतात, अशी माहिती शोभायात्रा आयोजन समितीतर्फे शुक्रवारी मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली गेली.

पोद्दारेश्वर राम मंदिरचे प्रबंधक विश्वस्त पुनीत पोद्दार पत्रपरिषदेत म्हणाले, श्रीराम जन्मोत्सव शोभायात्राचे यंदा ५८ वे वर्ष आहे. पोद्यादारेश्वर मंदिरापासून काही अंतरावर मोमीनपुरा ही मुस्लिमांची वस्ती आहे. रामनवमनीनिमित्त निघणारी शोभायात्रेत प्रत्येक वर्षी मुस्लीम समुदायातील अनेक लोक सभागी होतात. यंदाही शोभायात्रेचे मोमीनपुरा, नालसाहब चौकसह इतर दोन ठिकाणी अशा एकूण चार ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेचे स्वागत केले जाणार आहे. त्याबाबत काही दिवसांपूर्वी माजी मंत्री अनिस असमद, माजी नगरसेवकांसह मुस्लिम समुदारातील मान्यवरांसोबत बैठकही झाली आहे. तेही शोभायात्रेच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

दरम्यान मंदिर समितीकडूनही प्रत्येक वर्षी नित्याने ईद वा इतर उर्सच्या रॅलीचे स्वागत केले जाते. पुढेही ही प्रथा कायम राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नागपुरात नुकतेच झालेल्या हिंसाचाराचा हिंदु- मुस्लिम बांधवातील सद्भावनेवर काहीही परिणाम होणार नाही. आता मध्य नागपुरातील स्थिती सामान्य असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दरम्यान यंदाच्या शोभायात्रेत ९० हून जास्त दर्शनी सथ वा पथके सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेणार आहे. त्यात नुकत्याच झालेल्या कुंभ मेळ्याशी संबंधितही एक आकर्षक रथ राहणार असल्याचेही यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले.

२,५०० संस्थांकडून मदत, २० हजार स्वयंसेवक…

पोद्दारेश्वर मंदिरतर्फे आयोजित शोभायात्रेत २ हजार ५०० संस्थांकडून मदत केली जात आहे. तर २० हजार स्वयंसेवकही संपूर्ण शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी मदत करत आहे. या सगळ्याच स्वयंसेवकांना मंदिरतर्फे ओळखपत्रही दिले गेले आहे.

रुग्णवाहिका आल्यास काय?

शोभायात्रेचा मार्ग मोठा आहे. शोभायात्रेनिमित्त विविद संस्थेतर्फे चंद्रलोक बिल्डिंगच्या जवळसह इतरही चौकात विविध सजावटी केल्या जात आहे. भाविकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी शुद्ध पाणी, आंब्याचे पन्हे, हलवा, फळे, थंडाईसह इतरही पदार्थ उपलब्ध केले जाणार आहे. या शोभायात्रेदरम्यान कुणा रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका दिसल्यास तातडीने शोभायात्रा थांबवून प्रथम रुग्णवाहिकेला तेथून जाण्याचा मार्ग करून दिला जाईल. त्याबाबत सगळ्या स्वयंसेवकांना सूचना करण्यात आल्या असल्याचेही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. तर शोभायात्रेदरम्यान कुठेही वाद घालायचा नाही, केवळ एकाच ठिकाणी फटाका शोचे आयोजन केले असून इतरत्र हा शो घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना विविध संस्थेला केल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जर कुणी आमच्या संस्थांनीही नियमांचा भंग केल्यास त्यावर पोलिसांतर्फे कारवाई शख्य असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.